उत्तुर /कोल्हापूर : चिमणे ता. आजरा येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सासरा, सून आणि नातू यांच्यावर यशस्वी उपचार केल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. या सर्वांना सोमवारी सांयकाळी चिमणे येथे सोडण्यात आले. गावात आल्यानंतर फुलांचा वर्षाव व आरत्या ओवाळून त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.चिमणे.ता. आजरा येथील २२ वर्षीय आई, अकरा महिन्याचे बाळ आणि ५५ वर्षांचा सासरा हे मुंबईहून आल्यानंतर होम कॉरनटाईन झाले होते. त्यांचा स्त्राव घेतल्यानंतर त्यांना २५ मे रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सासऱ्यावर आजरा येथील कोविड केंद्रात तर सून आणि नातू यांच्यावर कोल्हापूरच्या छ. प्रमिलाराजे रुग्णालय येथे उपचार करण्यात आले.
यशस्वी उपचारानंतर त्यांचे कोरोना अहवाल पुन्हा निगेटिव्ह आले. या सर्वांना सोमवारी रात्री आठ वाजता चिमणे येथे सोडण्यात आले .रात्री गावात आल्यानंतर या कुटुंबियांवर ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करण्यात आला. आरत्या ओवाळून औक्षण करत त्यांचे गावात स्वागत करण्यात आले. दरम्यान, चिमणे गावातील एका पॉझिटिव्ह रूग्णाचा अहवाल येणे बाकी आहे. तो आजरा येथील कोविड केंद्रात उपचार घेत आहे.