बेळगाव : सदाशिवनगर येथील कोरोना बाधित रुग्णाच्या प्राथमिक संपर्कांत आलेल्या सर्वांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्राकडून सांगण्यात आल्यामुळे आरोग्य खात्यासह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.महाराष्ट्रातून आलेली सदाशिवनगर येथील गर्भवती महिला गेल्या १४ मे रोजी कोरोनाग्रस्त आढळून आली होती. त्यामुळे तिच्या प्राथमिक संपर्कात आलेल्या १० व्यक्तींना कॉरन्टाईन करण्यात आले होते. या सर्वांचे १२ दिवसानंतर स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत धाडण्यात आले होते.
या नमुन्यांचा तपासणी अहवाल नुकताच हाती आला असून संबंधित सर्व १०जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. सध्या शहरात सदाशिवनगर येथेच फक्त कंटेनमेंट झोन लागू आहे. याआधी आझाद गल्ली, कॅम्प, येळ्ळूर व पिरवाडी येथील कंटेनमेंट घेऊन हटविण्यात आले आहेत.सदाशिनगर येथील कोरोना बाधित गर्भवती महिला बरेच दिवस घरात राहिली असल्यामुळे बरेच जण संसर्गित झाले असावेत अशी भीती आरोग्य खात्याला वाटत होती. या महिलेला बेकायदा राज्यात (बेळगावात) आणल्याबद्दल तिचा पती व कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु आता तिच्या प्राथमिक संपर्कात आलेल्या सर्वांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासन व आरोग्य खात्यासह शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
येत्या कांही दिवसात संबंधित महिलेचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यास तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो आणि तसे झाले तर सदाशिवनगर येथील कंटेनमेंट झोन देखील हटविला जाईल.