कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार क्रीडा संकुले, मैदाने आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागा केवळ वैयक्तिक व्यायामासाठीच सामाजिक अंतराचे निकष पाळून खुल्या राहतील. मात्र, सामृहिक क्रीडा प्रकारासाठी वापर होता कामा नये, असा इशारा जिल्हा दंडाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.नॉन रेड झोनमध्ये क्रीडा संकुले, मैदाने आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागा या वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील, परंतु प्रेक्षक आणि सामूहिक क्रीडा प्रकार, व्यायाम प्रकार यांना परवानगी नाही. सर्व शारीरिक व्यायाम आणि इतर व्यायाम प्रकार यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून परवानगी देण्यात आली होती.
तथापि, नागरिक खुल्या मैदानावर, इतर मोकळ्या जागांवर व इनडोअर स्टेडियममध्ये सामूहिक क्रीडा प्रकार जसे की, क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, आदी तसेच काही नागरिक व्यायामशाळेत व्यायाम प्रकार करत आहेत.
क्रीडा साहित्यांची एकमेकांत देवाण-घेवाण होते, परंतु प्रत्येकवेळी असे साहित्य सॅनिटायझर करणे शक्य नसल्यामुळे असा सामूहिक वापर थांबविणे आवश्यक आहे. मोकळ्या जागांमध्ये सामूहिक क्रीडा प्रकार केल्यास व्यक्ती व त्यास साहाय्य करणाऱ्या सर्व व्यक्तींवर व संस्थेवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.