सतीश पाटील शिरोली : पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक लॉकडाऊनचे अडीच महिने उलटले तरी ४० टक्केच वाहने धावताना दिसत आहेत. महामार्गावरून हळूहळू वाहनांची वर्दळ वाढताना दिसत आहे.भारतात लॉकडाऊन जाहीर होण्या अगोदर पुणे बंगळूर महामार्गावरून दररोज सुमारे २० ते २१ हजार वाहने धावत होती. पण लॉकडाऊनच्या काळात २६ मार्च रोजी ५३४ तर २० एप्रिल रोजी २१५६ आणि ०७ जून रोजी ८०७२ वाहने धावली आहेत. आज ही फक्त ४० टक्केच वाहतूक सुरू आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात एक दिवसाची संचारबंदी केली. आणि याला संपूर्ण भारतातील लोकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून चांगला प्रतिसाद दिला. यानंतर २५ मार्च ते १४ एप्रिल हा २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला.
संपूर्ण भारतातील वाहतूक आणि वाहने आहे त्या ठिकाणी थांबली दळणवळण थांबले दररोज पुणे बंगळूर महामार्गावरून सुमारे, २० हजारहून अधिक वाहने धावत होती, तीही रस्त्यावर एका बाजूला आणि जिथे जागा मिळेल तिथे उभी राहिली. या मुळे कायम महामार्गावरून वाऱ्याच्या वेगाने धावणारी मालवाहतूक वाहने, ट्रक, टॅम्पो,लग्लझरी बसेस, अलिशान चारचाकी गाड्या ही सर्व वाहतूक आणि गाड्यांची चाके थांबली.
सुरूवातीला काही दिवस महामार्गावर शुकशुकाट होता. यातून मेडीकल, दवाखाने, अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने सुरू होती. २५ मार्च रोजी लॉकडाऊन सुरू झाला आणि महामार्गावरील वाहतूक बंद झाली तर २६ मार्च रोजी महामार्गावर किणी टोल नाका येथून पुणे आणि बंगळूर च्या दिशेने जाणारी फक्त ५३४ वाहने धावलेली नोंद झाली आहे. त्यादिवशी अत्यावश्यक सेवेतील फक्त दोन टक्के वाहने या रस्त्यावरून धावली आहेत. २१ दिवसांचे लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार बंदच होते.त्यामुळे कोणी कामानिमित्तसुद्धा घराबाहेर पडत नव्हते. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात आणि जगाच्या पाठीवर वाढतच गेला. त्यामुळे १४ एप्रिल नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात १५ एप्रिल ते ३ मे पर्यंत दुसरा लॉकडाऊन जाहीर केला. १५ एप्रिल नंतर लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंची गैरसोय होवू नये यासाठी धान्य, भाजीपाला, पेट्रोल डिझेल, दुध वाहतूक सुरू केली त्यामुळे महामार्गावरील वाहनांच्या संख्येत मार्च महिन्या पेक्षा एप्रिल मध्ये वाढ झाली २० एप्रिल रोजी किणी टोल नाका येथून गेल्या वाहनांची संख्या २१५६ इतकी नोंद झाली आहे. सुमारे दहा टक्के वाहने रस्त्यावरून धावत होती. दुसरा लॉकडाऊन ३ मे रोजी संपला यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने राज्यात ज्या ठिकाणी प्रवासी लोक अडकले आहेत.त्यांची तपासणी करून त्यांना रितसर परवानगी देऊन आपल्या घरी जाण्यासाठी थोड्या प्रमाणात मुभा दिली आणि मालवाहतूक गाड्यांना ही वाहतूकीसाठी परवानगी दिली. त्यामुळे महामार्गावरील वाहने धावू लागली तरी लॉकडाऊन पूर्वी जेवढी वाहने रस्त्यावरून धावत होती तेवढी वाहने आज धावत नाहीत ७ जून रोजी महामार्गावरून ८०७२ हजार इतकी वाहने धावली आहेत. आज ही महामार्गावरून फक्त चाळीस टक्केच वाहने धावत आहेत.यात मालवाहतूक गाड्यांची संख्या जास्त आहे. तर प्रवासी वाहतूक कमी प्रमाणात आहे.
कोरोना आणि लॉकडाऊन मुळे महामार्गावरील वाहनांची संख्या कमी आहे. पण मार्चच्या तुलनेत जुन मध्ये वाहतूक वाढली असून लॉकडाऊन उठल्यावर वाहनांची संख्या पुन्हा वाढेल.- समाधान पाटील, उपअभियंता रस्ते विकास महामंडळ
सध्या माहामार्गावरून मालवाहतूक गाड्यांची तसेच तुरळक प्रवासी वाहतूक सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा कमी होईल तसतसं वाहतूक वाढेल.- सुरेश कांबळेवाहतूक पोलीस कर्मचारी, शिरोली