कोल्हापूर : रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी, त्यांचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन, गाव ते जिल्हा पातळीवरील कोरोना केअर सेंटर, हाय रिस्क असलेल्या रुग्णांची विशेष देखभाल यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) चांगले आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी असले तरी अजून धोकाही तितकाच असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.नागरिकांनी बेसावध राहू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व परगावांहून आलेल्या नातेवाइकांना काही दिवस होम क्वारंटाईन केल्यास हा रिकव्हरी रेट चांगला ठेवून मृत्यूचे प्रमाणही कमी करू शकू, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.कोल्हापुरातील ७४९ कोरोना रुग्णांपैकी ७०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, हे प्रमाण ९४ टक्के आहे. आजवर केवळ आठजणांचा मृत्यू झाला असून हे प्रमाण एक टक्का आहे. हे कशामुळे घडले याबाबत सांगताना जिल्हाधिकारी म्हणाले, कोल्हापुरात सुरुवातीला केवळ १८ रुग्ण होते; मात्र रेड झोनमधून आलेल्यांची आरोग्य तपासणी केल्याने रुग्णांची संख्या वाढली.
आजवर २५ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील लहान-मोठ्या गावांपासून ते जिल्हास्तरावर परगावहून येणाऱ्या नागरिकांबाबत योग्य नेटवर्किंग केले. प्रशासन व आरोग्य यंत्रणेची योग्य साखळी निर्माण केल्याने कोरोनाचा संसर्ग रोखता आला. जे कोरोना रुग्ण हाय रिस्कमध्ये असतात, त्यांची माहिती आधीच कळल्याने त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले गेल्यामुळे मृत्युदरही कमी राखण्यात यश आले....अन्यथा समूह संसर्गाचा धोकाजिल्हाधिकारी म्हणाले, कोल्हापूरकरांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम, मास्क, एकमेकांच्या वस्तू सॅनिटाईझ करून वापरणे या गोष्टींचे पालन करा. परगावांहून आलेले नातेवाईक अगदी ते कुटुंबातील असले तरी त्यांना किमान १०-१२ दिवस होम क्वारंटाईन ठेवा. घराबाहेर फिरू देऊ नका. त्यामुळे समूह संसर्ग होणार नाही. रेड झोनमधून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन केल्यानेच आपण समूह संसर्ग टाळू शकलो हे धान्यात ठेवा.