कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर शहरात शु्क्रवारपासून दि. २१ सप्टेंबरपर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी केले आहे. या कर्फ्यूसाठी प्रशासनाची सक्ती असणार नाही.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीच्या नेतृत्वाखाली विविध ३० क्षेत्रांतील व्यापारी, व्यावसायिकांनी दि. १६ सप्टेंबरपर्यंत कर्फ्यू पाळून दुकाने बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, कोरोना रोखण्यासाठी कर्फ्यू पर्याय नसल्याचे सांगत राजारामपुरी, महाव्दार रोड परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
आपल्या व आपल्या कुटुंबाच्या काळजी व दक्षतेसाठी या कर्फ्यूचे पालन करावे. त्यामध्ये सामील होऊन आपली सर्व व्यापारी व व्यावसायिक आस्थापने बंद ठेवावीत, असे आवाहन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी गुरूवारी केले.
दरम्यान, या कर्फ्यूमध्ये सहभागी होणार नसल्याचे राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने बुधवारी जाहीर केले. त्यापाठोपाठ गुरूवारी महाव्दार रोड व्यापारी व रहिवासी संघानेही कर्फ्यूला विरोध करून दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा-बटाटा आणि भाजीपाला सौदे सुरू राहणार आहेत. शहरातील व्यापारी, व्यावसायिकांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
रेडीमेड, क्लॉथ-गारमेंट्सची दुकाने राहणार सुरू
कोल्हापूर शहरातील रेडीमेड, क्लॉथ अँड गारमेंट्स डीलर्स असोसिएशनही जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होणार नाही. या असोसिएशनने त्याबाबतचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. शहरात रेडीमेड, क्लॉथ आणि गारमेंटची सुमारे ७०० दुकाने आहेत. त्यांतील ७० टक्के दुकाने भाडेतत्त्वावरील जागेत आहेत. त्यांमध्ये सुमारे साडेतीन हजार कामगार आहेत.लॉकडाऊनमुळे सुमारे ८० दिवस दुकाने बंद राहिली. आता पुन्हा दुकाने बंद ठेवल्यास व्यापारी संपून जातील. कामगारांची अडचण होईल. त्यामुळे आज, शुक्रवारपासून होणाऱ्या जनता कर्फ्यूमध्ये या सर्व व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय असोसिएशनच्या बैठकीत घेतला आहे. यावेळी अजित मेहता, कमलाकर पोळ, विक्रम निसार, मुरली रोहिडा, प्रसाद नेवाळकर, कवन छेडा, गजानन पोवार, परेश मेढा, आदी उपस्थित होते.
या कर्फ्यूमध्ये हे राहणार सुरू
१) कृषी सेवा, औषध आणि दूध दुकाने२) अत्यावश्यक सेवा३) बँका४) राजारामपुरी, महाद्वार रोडवरील दुकाने५) बाजार समितीतील सौदे६) रिक्षासेवा७) पेट्रोलपंप
हे राहणार बंद
१) धान्य, मसाला, खाद्यतेल, किराण-भुसारी व्यापार२) ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स-इलेक्ट्रिकल, प्लायवूड, आदी विविध ३० क्षेत्रांतील व्यापार३) हॉटेल व्यवसाय४) बांधकाम व्यवसाय