सांगरूळ : सांगरूळ (ता. करवीर) येथील ‘त्या’ वृद्धाचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तब्बल पाच दिवस अहवाल येण्यासाठी लागल्याने त्यांच्या कुटुंबासह परिसराचा जीव टांगणीला लागला होता. अखेर बुधवारी सायंकाळी अहवाल आल्यानंतर साऱ्या परिसराने सुटकेचा नि:श्वास सोडला.
संबंधित वृद्ध हे गेले सहा महिने अर्धांगवायू झाल्याने घरीच होते. त्यांना रक्तदाब व अस्थम्याचाही त्रास होता. शनिवारी (दि. ११) सायंकाळी पाच वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. त्यांना श्वसनाचा त्रास असल्याने वैद्यकीय यंत्रणेने ‘कोरोना’ कक्षात दाखल केले आणि रात्री १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा घशातील स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे समजताच सांगरूळ परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित वृद्धाच्या मुलग्याचा ऐन तारुण्यात अपघाती मृत्यू झाल्याने घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर होती.
त्यात ‘कोरोना’ संशयित असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितल्याने पै-पाहुणे व जवळची मंडळीही त्यांच्या घरी जाण्यास घाबरत होती. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा अहवालाकडे लागल्या होत्या. त्यात अहवाल येण्यास उशीर झाल्याने घालमेल वाढली. बुधवारी सायंकाळी अहवाल निगेटिव्ह आल्याने परिसराने सुटकेचा नि:श्वास सोडला.