कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून शहर स्वच्छता आणि औषध फवारणीचे काम करणाऱ्या महानगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांवर सर्वत्र पुष्पवृष्टीसह सत्कार केले जात असताना दुसरीकडे मात्र एक नवश्रीमंत पदाधिकाऱ्याने चक्क आरोग्य निरीक्षकास कानशिलात लगावली आणि अश्लील शिवीगाळ केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता कसबा बावडा येथील भाजी मंडईत घडला.कसबा बावडा परिसरात असलेल्या भाजी मंडईत काही दिवसांपासून साचून राहिलेला कचरा उठाव करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी होती. दोन-तीन दिवसांपासून तो आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगत होता; परंतु हे काम कर्मचाऱ्यांद्वारे शक्य नव्हते म्हणून कचरा उठाव करण्यास जेसीबी आणि डंपरची मागणी आरोग्य निरीक्षकाने वर्कशॉपकडे केली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी हा सर्व कचरा उठाव करायचे ठरले होते. जेसीबी, डंपर मिळणार होते. त्याची पूर्वसूचना संबंधित पदाधिकाऱ्यास देण्यातही आली होती.परंतु गुरुवारी सकाळी पदाधिकाऱ्याने भाजी मंडईत जमलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आरोग्य निरीक्षकास कचरा का उचलला नाहीस याचा जाब विचारला. त्यावेळी दुपारनंतर उचलला जाईल, असे सांगूनही पदाधिकाऱ्याने ऐकले नाही. चार चौघांत थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
शिव्या देऊ नका असे सांगताच पदाधिकाऱ्याचा पारा आणखी वाढला. सरळ अंगावर धावून जात जोरात कानशिलात हाणली. काहीजण आडवे झाल्याने आरोग्य निरीक्षक थोडक्यात वाचला. अंगावर धावून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यास अन्य व्यक्तींनी रोखले. आजबाजूचे नागरिकही यावेळी जमले.या प्रकाराचा माहिती आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना देण्यात आली नंतर या सर्वांनी मिळून घडलेली गोष्ट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याही कानावर घालण्यात आली. आरोग्य निरीक्षक कसबा बावड्यातील असल्याने त्याने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या स्वीय साहाय्यकामार्फत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. शहरात सर्वत्र आरोग्य कर्मचाऱ्यांचे सत्कार होत असताना भर मंडईत आरोग्य निरीक्षकास अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून काय शिकावे, असा प्रश्न विचारला जात आहे.