कोल्हापूर : मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेतलेल्या मराठा युवकांच्या कर्जाचे व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. बॅँकांमध्ये महामंडळाच्या कर्जासाठी आतापर्यंत तरी कोणत्याही प्रकारचा कोटा नाही; परंतु येणाऱ्या काळात यासाठी मुख्यमंत्री स्वत: कोटा पद्धत ठरवून देणार आहेत. ते बॅँकांसाठी बंधनकारक राहील, असेही त्यांनी सांगितले.कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटील म्हणाले, महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मराठा युवकांना कर्ज मिळण्यासाठी जिल्हानिहाय दौरे करून आढावा घेतला जात आहे. या योजनेचा मराठा तरुणांनी उद्योगाच्या माध्यमातून लाभ घ्यावा.महामंडळाच्या कर्ज योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात ८४० तरुणांची कर्जप्रकरणे मंजूर केली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ६८ कर्जप्रकरणांचा समावेश आहे. या माध्यमातून ४ कोटी ४४ लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. अद्याप १९२ प्रकरणे प्रलंबित आहेत. एकंदरीत हे प्रमाण कमी असल्याने ते वाढविण्यासाठी आम्ही रस्त्यांवर उतरून तळागाळात जाऊन लोकांशी संवाद साधत आहोत. पुढील काही महिन्यांत जिल्ह्यातील हा आलेख वाढून तो पाच ते सहा हजारांपर्यंत जाईल.महामंडळाची कर्ज योजना जिल्हा सहकारी बॅँका व नागरी बॅँकांमध्ये लागू नसल्याने लोकांची थोडी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर नरेंद्र पाटील म्हणाले, या बॅँकांच्या शाखा गावागावांत असल्या तरी त्यांचे व्याजदर हे जास्त आहेत.सरकारची योजना ही साडेबारा टक्के व्याजाची आहे; त्यामुळे इतके व्याज आकारून ही योजना राबवावी यासाठी संबंधित बॅँकांना आवाहन केले आहे. त्यानुसार लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षाआहे.मराठी अधिकारी समन्वयक नेमाराष्टÑीयीकृत बॅँकांमध्ये अमराठी अधिकारी असल्याने कर्जप्रकरणांमध्ये संवाद साधताना अडचणी येत आहेत; त्यामुळे बँकांनी प्रवेशद्वारामध्ये या योजनेची माहिती देण्यासाठी मराठी भाषा अवगत असणारा अधिकारी समन्वयक म्हणून नेमावा, असे पाटील यांनी सांगितले.
‘मुद्रा’तील मराठा युवकांच्या कर्जाचे व्याज महामंडळ भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:09 AM