कोल्हापूर : तृप्ती माळवी यांनी महापौरपदाचा राजीनामा द्यावा म्हणून महानगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषणास बसलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी चक्क महापौरांच्या वाहनावरच हल्ला केला. नगरसेवकांनी वाहनाच्या आडवे होत हातात असलेल्या काळ्या झेंड्याच्या काठ्यांनी काचा फोडण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलीस आणि नगरसेवकांत पाच मिनिटे चांगलीच झटापट झाली. पोलिसांनी नगरसेवकांना बाजूला सारत महापौरांचे वाहन पुढे जाऊ दिल्यानंतर घोषणाबाजी करत नगरसेवकांनी परिसर दणाणून सोडला. माळवी यांच्या राजीनाम्यासाठी महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांनी मंगळवारी लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणात राष्ट्रवादीचे नगरसेवकही सहभागी झाले. उपोषण सुरू असतानाच महापौर माळवी महापालिकेतील आपल्या कार्यालयात पोहोचल्या. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर महापौर माळवी आपल्या वाहनातून पालिकेतून बाहेर पडत असताना उपोषणास बसलेल्या नगरसेवकांनी माळवी यांचे वाहन अडविले. त्यात महिला नगरसेवकही आघाडीवर होत्या. प्रत्येक नगरसेवकांच्या हातात काळ्या झेंडा असलेल्या काठ्या होत्या. या काठ्यांनी महापौरांच्या वाहनावर हल्ला चढविला. हातातील काठ्या पुढील, मागील व बाजूच्या काचांवर मारून त्या फोडण्याचा प्रयत्न झाला. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी नगरसेवकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला; परंतु संख्येने कमी असलेल्या पोलिसांना ते शक्य होत नव्हते. अखेरीस पोलीस व नगरसेवक यांच्यात झटापट झाली. वाहनाच्या आडवे पडलेल्या काही नगरसेवकांना पोलिसांनी अक्षरश: उचलून बाजूला केले. विशेष म्हणजे काही पदाधिकारीही त्यात आघाडीवर राहिले. अखेरीस पाच मिनिटांच्या झटापटीनंतर महापौरांचे वाहन नगरसेवकांच्या विळख्यातून बाहेर सोडणे पोलिसांना शक्य झाले. या झटापटीत एक महिला कॉन्स्टेबलच्या हातावर काठी बसल्याने किरकोळ जखमी झाली.उपोषण, जोरदार घोषणाबाजीमंगळवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून नगरसेवकांचे उपोषण सुरू झाले. त्यामध्ये उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायीचे सभापती आदिल फरास, शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते, महिला बालकल्याण सभापती लीला धुमाळ, परिवहन सभापती अजित पोवार, सभागृह नेते चंद्रकांत घाटगे, राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, इंद्रजित सलगर, रणजित परमार, महेश जाधव, रमेश पोवार, दिलीप भुर्के, कादंबरी कवाळे, कांचन कवाळे, दीपाली ढोणुक्षे, वैशाली डकरे, मीना सूर्यवंशी यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक सहभागी झाले होते. ‘लाचखाऊ माळवी यांचा धिक्कार असो’, ‘गली गली में शोर हैं, महापौर माळवी चोर हैं’, ‘महापौरपदाचा अवमान करणाऱ्या माळवी यांचा धिक्कार असो’, ‘मुर्दाबाद, मुर्दाबाद महापौर माळवी मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.‘ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं’वाहनावर हल्ला झाल्यानंतर महापौर माळवी तेथून निघून गेल्या. मात्र, नगरसेवकांनी घोषणाबाजीचा जोर अधिकच वाढविला. ‘ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं’ अशा घोषणा देत पालिकेचा परिसर दणाणून सोडला. महापौरांविरुद्धचा संघर्ष यापुढेही सुरुच राहणार असल्याची चुणूक दाखवून दिली.आम जनतेने पाहिला तमाशा यापूर्वी जनता विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष जनतेने पाहिला आहे परंतु यावेळी ‘नगरसेवक विरुद्ध महापौर’ असा संघर्ष प्रथमच पाहायला मिळत आहे. नगरसेवकांचे उपोषण, महापौरांच्या वाहनावर झालेला हल्ला आणि महापौरांविषयीच्या घोषणा हा सारा प्रकार मंगळवारी जनतेने पाहिला. त्यावेळी आंदोलनात आघाडीवर असणाऱ्या नगरसेवकांविषयी सर्वसामान्य जनतेतून काही वेगळ्याच प्रतिक्रिया उमटत राहिल्या.काळे झेंडे आणि काळ्या साड्यामहानगरपालिकेसमोर उपोषण करतेवेळी नगरसेवकांनी हातात काळे झेंडे घेतले होते. भ्रष्टाचारी महापौरांनी राजीनामा द्यावा अशा मागणीचे फलक घेतले होते; तर महिला नगरसेवकांनी काळ्या साड्या परिधान केल्या होत्या. महापौरांचे वाहन रोखण्यात महिलाच आघाडीवर होत्या.
महापौरांच्या वाहनावर नगरसेवकांचा हल्ला
By admin | Published: March 04, 2015 12:34 AM