कोल्हापूर : लाचखोर प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी यांनी नैतिकता सांभाळत तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांची सभागृहात व बाहेर दोन्ही ठिकाणी कोंडी करू. महासभेवर बहिष्कार टाकून कामकाज करून देणार नाही, असा इशारा सोमवारी राजेश लाटकर व शारंगधर देशमुख या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या गटनेत्यांनी दिला. तृप्ती माळवी यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने नगरसेवकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटली.ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार झाल्याच्या निषेधार्थ महापालिकेच्या विठ्ठल रामजी चौकात निषेध सभा झाली व विशेष सभा तहकूब करण्यात आली. यावेळी महापौरांवर सर्वच नगरसेवकांनी तोंडसुख घेतले.गटनेता राजेश लाटकर म्हणाले, हसन मुश्रीफ यांनी मोठ्या विश्वासाने माळवी यांना महापौर केले. आता त्यांनी संपर्कही तोडला आहे. गेल्या साडेचार वर्षांत पाच महिला महापौर झाल्या सर्वांनी नेत्यांचा आदेश मान्य करत राजीनामा दिला. गेले सहा महिने महापौरांना दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी साथ दिली. आता राजीनाम्याची वेळ आल्यानंतर मात्र माळवी गेली तीन आठवडे राजीनाम्यासाठी टोलवत आहेत. राजीनाम्यासाठी सभा बोलावून टाळत आहेत, हा सभागृहाचा अवमान आहे. महापौरांना यापुढे राष्ट्रवादीचे नगरसेवक काम करू देणार नाहीत. महापौरांनी ‘आघाडी धर्मा’लाच तिलांजली दिली आहे. ‘आघाडी धर्म’ न पाळणाऱ्या महापौरांना काँग्रेसचे नगरसेवकही काम करू देणार नाहीत. महापौरांच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात उपस्थित राहणार नाहीत. सभागृहाबाहेर त्यांच्या या कृत्याचा नगरसेवक निषेध करतील, असे गटनेता शारंगधर देशमुख यांनी जाहीर केले.महापौर सांगूनही राजीनामा देण्यास तयार नाहीत, त्यांच्या या कृत्याबाबत आता काय प्रतिक्रिया देणार. लाचखोर प्रकरण कित्येक वर्षे न्यायालयात चालेल तोपर्यंत त्या पदावर राहणार आहेत काय? महापौरांबाबत आज, मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली जाईल. - आमदार हसन मुश्रीफ
महापौरांना असहकार्याचा नगरसेवकांचा पवित्रा
By admin | Published: February 17, 2015 12:03 AM