कोल्हापूर : अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले आहे, याची जाणीव असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या काहीजणांशी मतभेद असतानाही या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीधर्माचे तंतोतंत पालन केल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. पाटील यांनीच प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या पाठीशी सर्व ती ताकद उभी केल्याने या दोघांच्याही विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
मंत्री पाटील यांचे धनंजय महाडिक यांच्यावरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळेच एका मेळाव्यात पाटील यांच्याविषयी आक्षेप घेतल्यानंतर भाजप-शिवसेनेमध्ये ऐन प्रचारावेळी थोडा ताणतणाव निर्माण झाला. मात्र हे प्रकरण न वाढविता पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूर शहरात भाजपची आपली स्वतंत्र यंत्रणा नेटाने कामाला लावली.
युतीची राज्यातील विराट अशी सभा घेऊन पाटील यांनी या जिल्ह्यात जी हवा केली, तिचा प्रभाव शेवटपर्यंत राहिला. सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील आणखी सात जागांची जबाबदारी असताना पाटील यांनी शेवटच्या तीन दिवसांत ‘गोकुळ’चा मुद्दा बाहेर काढून वातावरण ढवळून काढले. सुरुवातीच्या काळात प्रत्येक तालुक्यात मेळावा, कोल्हापूर शहरात व्यापाऱ्यांपासून ते स्वयंसेवी संस्थांसह अनेकांच्या घेतलेल्या बैठका, अधिकाधिक वैयक्तिक मान्यवरांच्या घरी जाऊन घेतलेल्या गाठीभेटी यांमुळे पाटील यांनी मंडलिक यांच्या प्रचारात कुठेही कसर सोडली नाही.
‘माझी छाती उघडून बघा, त्यामध्ये धनुष्यबाण दिसेल’ असे सांगत आपल्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड राबणूक करून घेतली. ‘माझी ‘मातोश्री’वर तक्रार जाता कामा नये’ अशी तंबीच पाटील यांनी दिली होती. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजय मंडलिक यांची प्रचारपत्रके घरोघरी वाटेपर्यंत कुठेही कमतरता भासू दिली नाही. ‘मोदींना पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करा,’ या चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि संजय मंडलिक पावणेतीन लाख मतांनी विजयी झाले.
तिकडे गेली दोन वर्षे नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेणाºया राजू शेट्टी यांचा पाडाव करण्यासाठी जे काही करावे लागले, ते चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यासाठी सदाभाऊ खोत यांच्यावर गेले वर्षभर ती जबाबदारी दिली. सुरेश हाळवणकर, शिवाजीराव नाईक या आपल्या आमदारांना पाठबळ देण्याबरोबरच धैर्यशील माने यांनाही सहकार्याचा हात दिला.पाटील यांची प्रतिष्ठा वाढलीएकीकडे राज्याचे महसूल, कृषी यांसारखी महत्त्वाची खाती असणाºया पाटील यांनी सांगायचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला होकार द्यायचा, असे चित्रे गेले साडेचार वर्षे महाराष्ट्र पाहत आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर किमान दहाजणांना महामंडळेही जाहीर करण्यात आली. कोणत्याही महत्त्वाच्या बाबतीत फडणवीस हे चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करतात. फडणवीस यांनी अतिशय गरजेच्या वेळी युती केली असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या ठरल्या. शिवसेनेचे हे दोन्ही खासदार निवडून आल्याने पाटील यांचीच प्रतिष्ठा मुंबईत वाढली आहे.