कोल्हापूर : आरटीपीसीआरच्या तुलनेत रॅपिड ॲन्टिजन चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त येत आहे, ॲन्टिजनमध्ये पॉझिटिव्ह असलेल्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे या दोन्ही किटमध्ये काय फरक आहे, त्रुटी आहेत का, याची तपासणी करावी, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केली. यावेळी त्यांनी कोरोनातील डेल्टा प्लस विषाणू व तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असेही निर्देश दिले.कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषा कुंभार उपस्थित होत्या.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालय व गडहिंग्लजमधील उपजिल्हा रुग्णालयासाठी सिटी स्कॅन मशीन लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत. जिल्ह्यात 'कोरोनामुक्त गाव' अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. जेणेकरून ग्रामीण भागातील रुग्ण संख्या नियंत्रणात येऊ शकेल.जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, जिल्ह्यात तपासण्या वाढवण्यात आल्या असून कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्याला रोज ५० हजार लसींचा पुरवठा होणे गरजेचे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.