जयसिंगपूर : शेती ग्राहकांच्या वीज बिलात दुरुस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन आंदोलन अंकुशच्यावतीने जयसिंगपूर महावितरणला देण्यात आले. यावेळी वीज बिल दुरुस्तीची मोहीम राबवावी, त्यानंतरच ग्राहकांना बिल भरण्यास सांगावे. चुकीच्या बिलामुळे शेतकरी योजनेपासून वंचित राहणार आहेत. तसेच थकीत वीज बिल असणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
महावितरणने कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ५० टक्के वीज बिल माफ केली जात असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे वीज मीटर बुडालेने जळाले तर काहीजणांचे महापुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. अशा वीज ग्राहकांना अंदाजे युनिट आकारणी करून बिले दिली आहेत, ती वापराच्या तीन ते चार पटीने ज्यादा दिली आहेत. तसेच रीडिंग न घेतल्याने त्यांनाही ज्यादा युनिट लावण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेचा जर शेतकऱ्यांनी घ्यावा, असे वाटत असेल तर शेतीपंप ग्राहकांची बिले दुरुस्त करावी लागणार आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये महापूर आल्यानंतर डिसेंबर २०१९ पर्यंत शेतीचा पूर्ण वीजपुरवठा बंद होता. त्या महिन्यातील वीज बिलेही सरासरीने आकारण्यात आली आहेत, ही बिलेही रद्द करावीत, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.
निवेदनावर धनाजी चुडमुंगे, प्रवीण माने, अशोक देशमुख, संजय चौगुले, प्रभाकर बंडगर, अवधूत काळे, प्रमोद बाबर, संभाजी मोरे, सुरेशराव भोसले यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.