कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे आज, शुक्रवारपासून सर्व महाविद्यालयांशी ई-मेलद्वारे पत्रव्यवहार केला जाणार आहे. विद्यापीठाने नववर्षातील हा पर्यावरणपूरक आणि गतिमान कामकाजाचा संकल्प केला आहे.विद्यापीठातील अधिविभाग प्रमुख तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे, मान्यताप्राप्त संस्थांचे सर्व प्राचार्य, संचालकांना विद्यापीठाकडून वेळोवेळी विविध प्रकारच्या कामकाजाबाबत पत्रव्यवहार, परिपत्रके पाठविली जातात. ही पत्रे, परिपत्रके काहीवेळेला महाविद्यालयास प्राप्त होत नाही अथवा विलंबाने मिळतात तसेच, सध्या शासनाकडूनही विद्यापीठ कार्यालयास विद्यापीठाशी व महाविद्यालयांशी निगडित विविध विषयांबाबत आवश्यक माहिती तत्काळ ई-मेलद्वारे मागविली जाते. अशावेळी महाविद्यालयाकडून माहिती वेळेत न मिळाल्यास शासनास पाठविण्यास विलंब होतो. विद्यापीठ प्रशासन वेळोवेळी महाविद्यालयांकडून ई-मेल आयडी मागवत असते पण, विद्यापीठाच्या असे निदशर्नास आले की, ही ई-मेल खाती महाविद्यालये पाहत नाहीत तसेच काही खाती प्राचार्य व संबंधित सेवकांचे व्यक्तिगत असतात. संबंधितांची बदली झाल्यास ई-मेलचे उत्तर न मिळाल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत असतो. विद्यापीठाने सर्व अधिविभाग, महाविद्यालय आणि शिक्षण संस्थांना (@४ल्ल्र२ँ्र५ं्न्र.ंू.्रल्ल) या डोमेनसह स्वतंत्र अधिकृत ई-मेल तयार करून दिले आहेत. त्यावरूनच हा पत्रव्यवहार करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)
महाविद्यालयांशी आता ई-मेलद्वारे पत्रव्यवहार
By admin | Published: January 01, 2016 10:06 PM