कुरुंदवाड : येथील पालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या भ्रष्ट कारभाराचे पुरावे चक्क घोडागाडीतून सनई वाजवत आणण्यात आले. जाधव यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कृती समिती पदाधिकाऱ्यांनी १४३९ पानांचा पुरावा संकलीत करुन वाजत गाजत आणले. या अनोख्या आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा रंगली होती.मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या आर्थिक ढपल्याची तपासणी गेल्या दोन दिवसांपासून त्रिसदस्यीय समितीकडून केली जात आहे. समितीने मुख्याधिकारी जाधव यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सर्वपक्षीय कृती समितीला म्हणणे मांडण्यासाठी आज, गुरुवारी पालिकेत बोलावले होते. यावेळी कृती समिती पदाधिकारी मुख्याधिकारी जाधव यांच्या भ्रष्ट कारभाराचा पुरावा असलेली १४३९ पाने संकलीत करुन घोडागाडीतून सनई वाजवत आणली. मात्र मुख्याधिकारी जाधव यांच्या विरोधात तक्रार करणारी पालिका सफाई महिला कर्मचारी त्रिमूर्ती वाघेला यांनी तक्रार अर्ज मागे घेतल्याने कृती समिती संतप्त झाली.कागदपत्रांची पुरावे असलेली घोडागाडी शहरातील मुख्य मार्गावरुन वाजत गाजत जाधव यांच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. पालिका चौकात सभा झाल्यानंतर पुरावे असलेली कागदपत्रे चौकशी समितीला देण्यात आली. आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख बाबासो सावगावे, माजी नगरसेवक राजू आवळे, अभिजित पोवार, सुनिल कुरुंदवाडे, कृती समिती अध्यक्ष अर्शद बागवान आदी सहभागी झाले होते.
कुरुंदवाड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याचा भ्रष्ट कारभार, घोडागाडीतून सनई वाजवत आणले पुरावे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 6:44 PM