कोल्हापूर/कागल : पिराचीवाडी (ता. कागल) येथील गर्भलिंग तपासणी प्रकरणाचे दोषारोपपत्र (चार्जशीट) आज, शनिवारी कागल न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. गर्भलिंग तपासणीचा मुख्य सूत्रधार बनावट डॉक्टर संशयित पिंटू रोडे हा अद्याप कागल पोलिसांना सापडलेला नाही. कालच्या छाप्यानंतर कागल परिसरात त्याची दिवसभर चर्चा सुरू होती. संशयित रोडे याच्याकडून शेजारच्या करवीर तालुक्यात सर्वाधिक गर्भलिंग तपासण्यांसह राधानगरी, कागल, मुंबई, बेळगाव या ठिकाणच्याही गर्भलिंग तपासण्या करण्यात आल्या असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेली मदतनीस संशयित राणी कांबळेसह संबंधिताचे जबाब घेण्याचे काम शुक्रवारी सुरू असल्याची माहिती छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे (सीपीआर) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी सांगितली.कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथे गर्भलिंग तपासणी होत असल्याच्या संशयावरून गर्भलिंग निदानविरोधी पथकाने (पीसीपीएनडीटी) डोंगराळ भागातील एका घरावर बुधवारी (दि. १) रात्री छापा टाकून एक मदतनीस व गर्भलिंग तपासणीसाठी आलेल्या ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील एका दाम्पत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन मुख्य सूत्रधार संशयित पिंटू रोडे हा बनावट डॉक्टर पसार झाला. त्यानंतर पथकाने या घरातील साहित्य जप्त केले. गुरुवारी (दि. २) पहाटेपर्यंत या पथकाने कारवाई केली. या कारवाईवेळी गर्भलिंग निदान तपासणीसाठी आलेल्या व्यक्तींच्या, घराबाहेर थांबलेल्या तीन आलिशान मोटारी पथकात असलेल्या कागल पोलिसांनी जप्त केल्या. संशयित आरोपी रोडेला यापूर्वीही दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक झाली होती. तर गर्भलिंग तपासणी कामात तो कपौंडर म्हणूनही यापूर्वी काम पाहत असल्याचे समजते. अलीकडच्या काळात त्याने गावात राहत्या घरात हे केंद्र सुरू केले होते. शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांचे पथक कागल पोलिस ठाण्यात गेले. या पथकात सहभागी असलेल्या काही कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले. तसेच संशयित मदतनीस राणी कांबळे, ठिकपुर्लीतील ‘त्या’ महिलेच्या पतीचे तसेच अन्य काही पतींचे जबाब घेण्यात आले. दिवसभर दोषारोपपत्राची प्रक्रिया सुरू होती. शुक्रवारीच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावयाचे होते; पण ही जबाबाची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती. कागल ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व्ही. एस. पुणदीकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यामुळे आज, शनिवारी कागल न्यायालयात गर्भलिंग तपासणी प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.आठ दिवसांपूर्वी पिराचीवाडी येथे गर्भलिंग तपासणी होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यामुळे पथकाने या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. कागल तालुक्यासह शेजारच्या तालुक्यांतून गर्भलिंग तपासणी केल्याचीही माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. याचाही सखोल तपास केला जाणार आहे.- डॉ. एल. एस. पाटील,जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर, कोल्हापूर.कारवाईच्या भीतीने जिल्ह्णातील काही डॉक्टर गर्भलिंग चाचणी कर्नाटकच्या परिसरात करीत असल्याचे समजते. जिल्ह्णातील अशा बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यासाठी आरोग्य विभाग आणि पोलिस संयुक्त मोहीम राबवितील. - एम. बी. तांबडे, पोलिस अधीक्षक
पिराचीवाडी गर्भलिंग तपासणीप्रकरणी आज दोषारोपपत्र
By admin | Published: February 04, 2017 12:53 AM