रेनकोट खरेदीत घोटाळा असल्याचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : कोरोनाकाळात नगरपालिका आयुक्त महावीर बोरनवर यांनी पालिकेच्या आर्थिक व्यवहारात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप विरोधी गटाच्या नगरसेवकांनी केला आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.
यावेळी नगरसेवकांनी सांगितले की, ८ जुलै रोजी स्थानिक वृत्तपत्रांतून टेंडर नोटीस देण्यात आली होती. मात्र सात जुलै रोजी संबंधित कामाचे कोटेशन मागून घेतले होते. आनंद बॅग, आदर्श बॅग व गौरव बॅग अशी तीन कोटेशन आली होती. मात्र तिन्ही दुकानांचा जीएसटी नंबर एकच असल्याचे समोर आले आहे. त्यांतील एका कोटेशनवर नाव व शिक्का नाही; तर दोन कोटेशनवर राजू शेटके यांच्या आदर्श बॅगचा शिक्का आहे. त्यामुळे कोटेशन खरी आहेत की भ्रष्टाचारासाठी नाममात्र आहेत हे तपासावे लागेल, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
कोटेशननुसार ९८ हजार ४३७ रुपयांची खरेदी दाखवली आहे. १२५ रेनकोट खरेदी दाखवले असले तरी केवळ ८० रेनकोटांचे वाटप झाले आहे.
प्रशासकीय काळात गरजेच्या नावाखाली आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे. मास्क, केमिकल खरेदी करण्यासाठी भरमसाट बिले दाखविण्यात आली आहेत. शासकीय कालावधीत जी खरेदी झाली आहे यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे, असा आरोप विरोधी गटाने केला आहे. आयुक्त निपाणी स्वच्छ करण्याच्या नावाखाली नगरपालिकाच स्वच्छ करीत आहेत व त्याना लोकप्रतिनिधी पाठीशी घालत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
यावेळी विरोधी गटाचे नगरसेवक विलास गाडीवडर, रवींद्र शिंदे, बाळासाहेब देसाई सरकार, संजय सांगावकर, दत्ता नाईक, डॉ. जसराज गिरे, आदी उपस्थित होते.