दत्ता पाटील - तासगाव --पोटासाठी सुरू असलेल्या भटकंतीतून मिळेल त्या जागेवर झोपडी उभारून राहिलेल्या भटक्या समाजाला तासगाव नगरपालिकेने हक्काचे घर मिळवून दिले खरे. मात्र या घरांची अवस्था पाहिल्यास, घरापेक्षा झोपडीच बरी, अशी परिस्थिती दिसून येत आहे. साडेचार कोटी रुपये खर्चून तासगाव नगरपरिषदेने ३९७ घरकुले उभी केली. परंतु या घरकुल योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे कामावरून दिसून येत आहे. या घरांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. स्लॅबचे घर असूनही या घरांना थोड्याशा पावसानेही गळती लागत आहे. त्यामुळे या घरकुल बांधकामाची चौकशी करुन दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.तासगाव शहराबाहेर झोपडपट्ट्यांची संख्या मोठी होती. मिळेल तो रोजगार आणि पडेल ते काम करुन पोटासाठी भटकंती करणाऱ्या भटक्या व विमुक्त समाजातील लोकांना झोपडीवजा घरच निवाऱ्याचे साधन होते. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या लोकांची व्यथा जवळून पाहिली होती. आम्हाला राहण्यासाठी घर द्या, अशी मागणीही झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांनी निवडणुकीच्या काळात आर. आर. पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर आर. आर. पाटील यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनपातळीवर पाठपुरावा केला. केंद्र शासनाच्या योजनेतून घरकुल योजनेसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर करुन आणला. २०१० मध्ये नगरपालिकेकडून दत्त माळावरील इंदिरानगर परिसरात ३९७ घरे बांधण्यास मंजुरी देण्यात आली. या कामाचा ठेका रोडलॅन्ड कन्स्ट्रक्शन्स या कंपनीने घेतला होता. दोन खोल्या, शौचालय आणि स्रानगृह, असे या घरांचे स्वरूप होते. हे काम पूर्ण करण्यासाठी मार्च २०१५ पर्यंतची मुदत होती. या योजनेतून मंजूर झालेला साडेचार कोटींचा निधीही खर्ची पडलेला आहे. घरकुलाचा लाभ देण्यासाठी नगरपालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातून लाभार्थ्यांची नावे निश्चित करण्यात आली होती. बांधकामाचा ठेका घेतलेल्या कंपनीचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर, काही नगरसेवकांच्या सांगण्यानुसार घरांचे हस्तांतरण पूर्ण होण्यापूर्वीच लाभार्थ्यांनी या ठिकाणी राहण्यास सुरुवात केली. मात्र या ठिकाणी राहण्यासाठी आल्यानंतर या घरांच्या दर्जाचा विषय चव्हाट्यावर आला आहे. इथे बांधण्यात आलेल्या घरांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. घरांच्या स्लॅबचे काम व्यवस्थित झालेले नाही. थोडासा पाऊस झाला तरी येथील बहुतांश घरांना गळती सुरु होते. स्लॅबचे घर असूनही पावसाचे पाणी घरात येत असल्यामुळे, ही गळती थांबवायची कशी, असा प्रश्न येथे राहणाऱ्या लोकांना पडला आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आल्यामुळे चिंंतेत भर पडली आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का? या घरकुलांचा लाभ ३९७ कुटुंबांना मिळणार आहे. या ठिकाणी एक हजारहून अधिक मतदारांची व्होट बँक आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीस उभ्या राहणाऱ्या प्रत्येक उमदेवाराचा या हजार मतांच्या व्होट बँकेवर डोळा असतो. आमदार, खासदार आणि नगरसवेक म्हणून प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रत्येकाला येथील व्होट बँकेचा फायदा झालेला आहे. निवडणुकीवेळी आश्वासनांची खैरात करण्यासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी, येथील घरकुलांचे काम निकृष्ट होऊनही त्याकडे दुर्लक्ष का केले आहे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तत्कालीन गृहमंत्र्यांनी या लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी घरकुलांना निधी दिला होता. आताच्या लोकप्रतिनिधींकडून चांगल्या दर्जाच्या कामाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुढाकाराची किमान अपेक्षा व्यक्त होत आहे.‘आबा’ देवमाणूस, पण!‘आर. आर. आबा देवमाणूस व्हता. त्यांच्यामुळंच आमाला झोपडीच्या जागी चांगलं घर ऱ्हायला मिळालं. हाक्काचं घर मिळालं, पर या घरात आल्यावर वाईट आनभव आला. वायश्या पावसात घरं गळाया लागल्यात. झोपडीची गळती थांबवायचं सोपं हाय. पर या घराची गळती कशी थांबवायची, हे कळना झालंय. आबा आसतं तर आमची दखल घेतली आसती. पर आता या घराचं काम कोण करणार?’ अशी सर्वसाधारण प्रतिक्रिया येथे राहणाऱ्या प्रत्येकाचीच आहे. त्यामुळे झोपडीतून घरात आलेल्यांना किमान घरात राहिल्याचे समाधानही मिळाले नसल्याचे चित्र आहे.साडेचार कोटी रुपयांचा चुराडाचया घरांची अवस्था पाहिल्यानंतर, साडेचार कोटी रुपयांचा अक्षरश: चुराडाच झाल्याचे दिसून येते. घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळेच घरांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच या घरांचे काम व्यवस्थितरित्या पूर्ण करून द्यावे, अशी मागणी झोपडपट्टीधाकरांकडून होत आहे. शौचालयांची दुरवस्थायेथील बहुतांश घरांच्या खिडक्यांचे काम पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण झालेल्या ठिकाणच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. शौचालय, स्नानगृहाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. बांधकाम करताना शौचालयावर मोकळी जागा ठेवलेली आहे. या जागेमुळे घराला कुलूप असले तरीही एखादा चोर सहजपणे आत जाऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.
तासगावमधील घरकुल योजनेत भ्रष्टाचार
By admin | Published: June 11, 2015 10:41 PM