इचलकरंजी : काम न करता महापालिकेतील ९८ लाखांची रक्कम घेणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्यावर मंत्र्यांनी उत्तर दिले.आवाडे म्हणाले, महापालिकेतील भ्रष्टाचार शशांक बावचकर यांनी उघडकीस आणला आहे. शाळा आणि क्रीडांगण दुरुस्त न करता खोट्या सह्या करून ९८ लाख रुपये ठेकेदारांनी घेतले. यातील कोणतीही कामे झाली नाहीत. यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेतील कागदपत्रे गहाळ केली जात आहेत. फोटो काढण्यास गेले असता दमदाटी केली जाते. गेल्या दहा वर्षांत असे प्रकार सर्रास सुरू आहेत. यामध्ये तडीपार झालेला संजय तेलनाडे आणि त्याचा भाऊ सुनील तेलनाडे यांच्याभोवती रॅकेट फिरत आहे. त्यातील एका गुंडाला अटक करण्यात आली. अटक केल्याशिवाय सोडता येत नाही म्हणूनच त्याला अटक केली. या गुन्ह्याच्या मागे तो आहे. सर्व ठेकेदार त्याचे पगारी नोकर आहेत. दाब देऊन तो निविदा घेतो. दुसरे कोण भरायला आले, तर त्यांना दमदाटी करतो. कोणतेही काम न करता पैसे लुटायचे काम सुरू आहे.अंगणवाडीवरही कोट्यवधी रुपये खर्च केले. १०० कूपनलिका नादुरुस्त आहेत, असे दाखवून त्याचे अहवाल तयार करून नवीन कूपनलिकेचे पैसे घेतले तरी शैलेंद्र पोवार, विनय राठी, संजय पाटील, इम्रान मैंदर्गी, डॉ. सुनीलदत्त संगेवार आदींची ईडी अथवा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी करावी. याला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी समिती व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा अहवाल घेऊन कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, त्यावर आवाडे यांचे समाधान झाले नाही. त्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर मंत्री सामंत यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी करण्याची मागणी मान्य केली आणि तातडीने चौकशीचे आदेश दिले.
ठेकेदार व अधिकारी यांचीही चौकशीयाप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. मी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत प्रत्येकाची सही कशी झाली? ती तपासली का गेली नाही, याची देखील चौकशी होणे गरजेचे असल्याचे सामंत यांनी सांगितले.