कागल : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावरील ईडीच्या धाडीवेळी नागरिक त्यांच्या दारासमोर अधिकाऱ्यांच्या समोर समर्थनात उभे राहिले होते. मात्र पालकमंत्री मागच्या दाराने पळून गेले. याचाच अर्थ त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे स्वतःच सिद्ध केले, अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांनी केली.कागलमधील विक्रमनगर, शाहूनगर, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक व मुजावर गल्ली येथे सभेत ते बोलत होते. यावेळी आनंदा माणगावकर, रोहित माणगावकर, देवदास मोरे यांनी कार्यकर्त्यांसह शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.घाटगे म्हणाले, शाहू महाराजांची जनक भूमी असलेल्या कागलची ओळख पालकमंत्र्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे चुकीची निर्माण झाली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री असूनही येथे ५०० बेडचे हॉस्पिटल आणले नाही. सुदृढ व स्वावलंबी पिढी घडवण्याऐवजी त्यांना बिघडविण्याचे काम पाकीट संस्कृतीतून केले.राजेंद्र जाधव म्हणाले, ४० वर्षांपूर्वी पालकमंत्री वाय. डी. माने यांच्या स्कूटरवरून फिरायचे. आज त्यांच्याकडे, नातेवाइकांकडे कोट्यवधींची मालमत्ता कोठून आली. रमीज मुजावर म्हणाले, मुश्रीफ यांनी ज्या चार ठेकेदारांना मोठे केले त्यामधील एक कागल शहरातील आहे. मुस्लिम बांधवांसाठी मुश्रीफ यांनी काय केले हे तपासा.माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी म्हणाले, समरजित घाटगे उच्चशिक्षित आहेत. शाहू ग्रुपची धुरा त्यांनी यशस्वी सांभाळली आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या विरोधकांना शाहूंचा वंशज आमदार म्हणून का चालत नाही? यावेळी अखिलेश घाटगे, सुरेश कुराडे, शिवानंद माळी, सागर कोंडेकर, हौसाबाई धुळे, दादू गुरव, दगडू चौगुले, दिलीप पाटील, प्रमोद हर्षवर्धन, संकेत भोसले, हिदायत नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले.
मागच्या दाराने पळून गेल्याने भ्रष्टाचार सिद्ध, समरजित घाटगे यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 4:55 PM