कोल्हापूर : ‘लोकमत’मध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या ‘अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला’ या वृत्तमालिकेतील ‘५ हजार साड्या कोणी लाटल्या’ या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी प्रभारी व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्याकडील कार्यभार तडकाफडकी काढून घेतला. धनाजी जाधव हे देवस्थानचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांचे बंधू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या खंबीर भूमिकेमुळे या भ्रष्टाचारची त्यांनी गांभीर्याने दखल घेतल्याचे स्पष्ट झाले. सेवाज्येष्ठतेनुसार जोतिबा मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांना अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापकपद देण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीत गेल्या चार वर्षांत झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी वृत्तमालिका ‘लोकमत’मध्ये सध्या सुरू आहे. माहितीच्या अधिकारात याबाबतची कागदपत्रे मागवण्यात आली होती. याअंतर्गत चौथा भाग अंबाबाई देवीच्या साड्यांवर आधारित होता. महापुराच्या काळात अंबाबाई मंदिरातून ५ हजार साड्या पूरग्रस्त महिलांना वाटप करण्यासाठी म्हणून नेण्यात आल्या. या साड्या कोणी नेल्या, कधी नेल्या, त्या किती पूरग्रस्तांना वाटण्यात आल्या याची नोंद ठेवण्याची जबाबदारी मंदिराचे प्रभारी व्यवस्थापक म्हणून धनाजी जाधव यांची होती; परंतु त्यांनी कामात कसूर केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी त्यांच्याकडील प्रभारी व्यवस्थापकपदाचा कार्यभार काढून घेतला. त्यांच्याकडे तोफ उडविण्याची जबाबदारी आहे, तीच कायम ठेवली आहे. देवस्थानचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांचे धनाजी हे बंधू आहेत.
जोतिबा मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांची बदली करून अंबाबाई मंदिराचे नवे व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली. सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना हे पद देण्यात आले आहेत.
दहा वर्षे पद रिक्त
अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापकपद गेल्या १० वर्षांपासून रिक्त होते. प्रभारी म्हणून व्यवस्थापक पदावरच मंदिराची धुरा वाहिली जात होती. अखेर दहा वर्षांनी मंदिराला पूर्णवेळ व्यवस्थापक मिळाला आहे.
भ्रष्टाचाराची गंभीर दखल
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी धनाजी जाधव यांचा कार्यभार काढून घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट झाली. त्यांनी या भ्रष्टाचाराची गंभीरपणे दखल घेतली असून कोणाचीही मुलाहिजा न ठेवता ते भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढतील आणि संबंधितांवर कारवाई करतील, अशा अपेक्षा उंचावल्या आहेत.