राहुल मांगुरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील शिवशंकर गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करीत इतर सर्व अवांतर खर्चाला फाटा देत दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रवींद्र अरुण पाटील या युवकाच्या उपचारासाठी निधी देण्याचा संकल्प करून लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणेशोत्सव सुरू केला, तो हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत या मंडळाने इतर मंडळांसमोर आदर्श निर्माण केला आहे.अर्जुनवाड-शिरोळ रोडलगत असलेल्या शिवशंकर मंडळाचे नेहमी वेगळेपण यावर्षीही ठेवण्याच्या उपक्रमाचे कौतुक परिसरात सर्वत्र होत आहे. मंडळाने गेल्यावर्षी गणेश उत्सवात मिरज येथील फाटक अनाथालयात गरीब व गरजंूनामोफत फळे वाटप, अन्नदान, कपडे, आदींचे वाटप केले होते. काही मंडळे दरवर्षी गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात खर्च करीत असली तरी या मंडळाने स्वत: व लोकवर्गणी, आदीनिधीच्या माध्यमातून वर्गणी गोळा करून शिरोळ रस्त्यावर गणेश मंदिराची उभारणी केली आहे. यातून मोठ्या प्रमाणात भाविक याचा लाभ घेतात, तर मंडळाच्या वतीने
प्रत्येक संकष्टीला अन्नदान केले जाते. याचा फायदाही भाविकांबरोबर गरीब व गरजूंना होत आहे.विद्युत रोषणाई व इतर खर्चाला पूर्णपणे फाटा देण्यात आला असून, गरीब व गरजू व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या रवींद्रचे दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झाल्याचे समजताच त्याला आवश्यकते सहकार्य करण्यासाठी मंडळ व कार्यकर्त्यांनी धाव घेतली आहे. रवींद्र पाटील हा ३० वर्षांचा अविवाहित युवक असून, घरी आई-वडील व एक भाऊ असे कुटुंब असलेला सध्या मुंबई येथे जसलोक रुग्णालयात उपचार घेत आहे. आठवड्यातून दोनदा डायलेसिस करावे लागत आहे, तर महिन्याभरानंतर सर्व तपासण्यापूर्ण झाल्यानंतर आई सुमनत्याला किडनी देणार आहे. या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे.
रवींद्रच्या मदतीसाठी खासदार राजू शेट्टी, वस्त्रोद्योग महामंडळाचे रविकांत तुपकर, आमदार उल्हास पाटील, रोटरी शिरोळचे अमित पोतदार, विजय माळी, डॉ. संजय पाटील, तंटामुक्तचे अध्यक्षविलास पाटील, चैतन्य शेट्टी, वैभव इंगळे, आदींनी मदतीसाठी हात पुढे केला आहे, तर शिवशंकर मंडळाचे अध्यक्ष किरण देसाई, हणमंत उगारे यांच्यासह मंडळाचे सर्वच कार्यकर्ते जास्तीत जास्त निधी त्याच्या उपचारासाठी देण्याचा प्रयत्न करीत आहेत.