कोल्हापूर : कोथिंबीरची आवक मंदावल्याने दरात एकदम वाढ झाली असून, किरकोळ बाजारात जवारी कोथिंबीरची पेंढी तब्बल ५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मेथीही चांगलीच कडाडली असून, २0 रुपये पेंढी झाली आहे. कडधान्याच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही. वटपौर्णिमेमुळे आंब्याच्या मागणीत वाढ झाली असून, ‘लालबाग’, ‘मद्रास’, ‘नीलम’ आंब्याने बाजार फुलून गेला आहे.मध्यंतरी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने कोथिंबीरच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, बाजारात आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. बाजार समितीत रोज १२ हजार पेंढ्यांची आवक होते. विशेषत: जवारी कोथिंबीरला अधिक मागणी असल्याने त्याचा दर ५० रुपये पेंढी पर्यंत पोहोचला आहे.
पालेभाज्यांची आवकही मंदावल्याने दरात वाढ झाली असून, मेथी २० रुपये, पोकळा १०, तर पालक पाच रुपये पेंढी राहिली आहे. कोबी, वांग्याच्या दरात फारसा चढउतार दिसत नसून, टोमॅटोची आवक कायम राहिली असली तरी दरात थोडीसी घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात २० रुपये टोमॅटो आहे. ढब्बू, गवार व वरणाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात वरणा ७५ रुपये किलो आहे. प्लॉवर, दोडका, भेंडीचे दर स्थिर आहेत.तूरडाळीच्या दरात थोडी वाढ झाली असून, किरकोळ बाजारात १00 रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे. हरभरा डाळ, मटकी, मूगासह इतर कडधान्यांच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही. साखर ३६ रुपये, सरकी तेल ८५ रुपयांवर कायम आहे. मान्सून अद्याप सक्रीय नसल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठांत शांतता दिसत आहे. वरणा बियाण्यांना मागणी वाढली असून, ६० ते ८० रुपये किलो पर्यंत दर आहे.फळ मार्केटमध्ये सध्या ‘तोतापुरी’, ‘अननस’ व आंब्याची आवक दिसते. वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर रविवारी आंबा खरेदीसाठी गर्दी दिसत होती. ‘नीलम’, ‘लालबाग’ आंबा ५० रुपये किलो आहे. फणसाची आवकही सुरू झाली असून, त्याचा २५ पासून १५० रुपयांपर्यंत दर राहिला आहे. तोतापुरी आंब्याची आवकही वाढू लागल्याने १0 ते २0 रुपये आंबा आहे. कांदा, बटाट्याचे दर स्थिर असून, घाऊक बाजारात लसूण ५० रुपये किलोपर्यंत आहे.‘राजापुरी’ २५ रुपये आंबा!हापूस आंब्याचा हंगाम संपत आला असला, तरी ‘राजापुरी’ आंब्याची आवक सुरू झाली आहे. आकाराने मोठा असणारा आंबा २५ रुपयाला एक आहे. गोडीला चांगला असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.