कोल्हापूर : येथील शाहू जकात नाक्यासमोरील वैभव हौसिंग सोसायटीच्या माळावर कारमध्ये सिमेंट विक्रेत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार आज (गुरुवारी) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला. राजीव वसंतराव कुडाळकर (वय ३५, रा. अथर्व टॉवर, ताराबाई पार्क) असे त्यांचे नाव आहे. व्यावसायिक ताण-तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज गोकुळ शिरगाव पोलिसांनी वर्तविला आहे. या आत्महत्येचे वृत्त शहरात पसरताच व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, शाहू जकात नाक्यासमोरील वैभव हौसिंग सोसायटीच्या पूर्वेकडील माळावर दुपारी बाराच्या सुमारास एका पांढर्या रंगाची कार येऊन थांबली. ही कार दुपारी साडेचारपर्यंत बेवारस स्थितीत त्याच जागी थांबल्याने परिसरातील नागरिकांना शंका आली. त्यांनी कारजवळ जाऊन पाहिले असता चालकाच्या सीटवर तरुण मृतावस्थेत पडल्याचे दिसले. त्यांनी गोकुळ शिरगाव व करवीर पोलिसांना ही माहिती दिली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारची पाहणी केली असता कारचे दरवाजे लॉक होते. आतमध्ये चालकाच्या सीटवर तरुण निपचित पडलेला दिसला. पोलिसांनी बनावट चावीने गाडीचे दरवाजे उघडले. गाडीतून तरुणास बाहेर काढून त्याच्या खिशामध्ये ओळख पटण्यासाठी काही सापडते का याची पाहणी केली असता ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांना मिळाले. त्यावरून त्यांची ओळख पटली. पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांकडे चौकशी केली असता त्यांचा शाहूपुरी तिसर्या गल्लीमध्ये सिमेंट विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायाच्या ताण-तणावातून त्यांनी हे कृत्य केले असावे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह सीपीआर शवागृहात आणल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांसह मित्रपरिवारांनी मोठी गर्दी केली होती. तोंडात रूमालाचा बोळा राजीव कुडाळकर यांच्या तोंडात रूमालाचा बोळा असल्याने घातपाताची शक्यता पोलिसांनी वर्तवली. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली. श्वान- पथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. परंतु, तसा काही प्रकार आढळून आला नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे यांनी सांगितले. कुडाळकर यांनी विष प्राशन केल्यानंतर उलट्या होऊन त्रास होणार तसेच आवाजाने परिसरातील नागरिकांना कळेल हे लक्षात घेऊन त्यांनी तोंडात रूमालाचा बोळा घातला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.(प्रतिनिधी)
कोल्हापुरात सिमेंट विक्रेत्याची आत्महत्या कारमध्ये विष प्यायले : ताण-तणावातून कृत्य ?
By admin | Published: May 09, 2014 12:33 AM