कोल्हापूर : काळा दिन पाळल्याबद्दल सीमाभागात मराठाबांधवांवर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचे पडसाद कोल्हापुरात उमटले. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवून सीमाबांधवांच्या समर्थनार्थ व कन्नडीगांचा निषेधासाठी कोल्हापुरात ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीमा परिषद घेण्याचा निर्णय झाला. कर्नाटकच्या दडपशाहीला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला.कर्नाटक पोलिसांचा निषेध करण्यासाठी व सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे निषेध सभेचे आयोजन केले होते. बैठकीत कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांना क्रूर पद्धतीने केलेल्या मारहाणीचा निषेध करून विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटून त्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मारहाणीसंदर्भात बेळगावच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊया, जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊया, खासदार-आमदारांचा दबावगट निर्माण करण्यासाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय बैठक घ्यावी, त्याचबरोबर सीमा लढ्याला पुन्हा एकदा पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात व्यापक सीमा परिषद घ्यावी, अशा महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे.यावेळी माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या वाईट प्रवृत्तीचा निषेध आहे. प्रसाद जाधव यांनी प्रास्ताविक केले. बबनराव रानगे यांनी आभार मानले. शंकरराव शेळके,शिवाजी हिलगे, इंद्रजित सावंत, बाबा पार्टे, रघुनाथ कांबळे, डॉ. संदीप पाटील, अॅड. पंडितराव सडोलीकर, सुखदेव बुध्याळकर, हर्षल सुर्वे, संजय काटकर, संग्रामसिंह निंबाळकर, साजिद खान, शिवाजी ससे, रणजित आयरेकर, शाहू जाधव, सोमनाथ घोडेराव, आनंद म्हाळुंगेकर, वैभव राजेभोसले, महादेव पाटील, अशोक माळी, अवधूत पाटील, संदीप पाटील, संतोष घाटगे, दीपा ढोणे, नेहा मुळीक, सुजाता चव्हाण, मंगल कुराडे, इंद्रजित पाटील, बळिराम देसाई, अशोक माळी, आदी उपस्थित होते.अनिल घाटगे, सुनीलकुमार सरनाईक, सचिन तोडकर, नगरसेविका रूपाराणी निकम, उदय लाड, शैलजा भोसले, संदीप पाटील, प्रसाद जाधव आदींनी सूचना केल्या. (प्रतिनिधी)खासदारांचा दबावगट हवा : ओऊळकरसीमा लढ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासदारांचा दिल्ली दरबारी दबाव गट निर्माण करावा, अशी सूचना माजी सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर यांनी मांडली. मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कर्नाटक पोलिसांविरोधात कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊया, अशी सूचना संभाजीराव जगदाळे यांनी केली.कर्नाटकातील मराठी भाषिकांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित निषेध सभेत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शंकरराव शेळके, शैलजा भोसले, रूपाराणी निकम, दीपा पाटील, सचिन तोडकर, बाबा पार्टे, आर. के. पोवार, अॅड. पंडित सडोलीकर, डॉ. संदीप पाटील, आदी उपस्थित होते.
सीमाबांधवांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात परिषद
By admin | Published: November 06, 2016 12:07 AM