कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळासाठी गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील संपादित करण्यात येणाऱ्या अतिरिक्त ६४ एकर जमिनीची आज, गुरुवारपासून मोजणी सुरू होत आहे. शनिवार(ता.१२)पर्यंत ही मोजणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उपअधीक्षक भूमिअभिलेख करवीर यांच्या उपस्थितीमध्ये जमिनीची मोजणी होणार आहे.
याबाबत जमीन मोजणीच्या पंधराशेहून अधिक खातेदारांच्या नोटिसा गावातील तलाठ्याने लागू केल्या आहेत. त्यामध्ये २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९१, ३२२, ३२३, ३२४, ३२६ अ, ३२७ या सर्व्हे नंबरमधील खातेदारांचा समावेश आहे. नेमक्या कोणत्या मिळकती विमानतळ विस्तारीकरणाच्या अतिरिक्त भूसंपादनामध्ये जाणार, याची स्पष्टता या मोजणीनंतरच होणार आहे. प्रशासनाकडून मोजणीची तयारी झाली असून, मोजणीदरम्यान कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असून, त्यासाठी सर्व खातेदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन गडमुडशिंगीच्या मंडल अधिकारी अर्चना गुळवणी यांनी केले आहे. विस्तारीकरणामधील नोटीस प्राप्त पंधराशे प्रकल्पग्रस्तांपैकी बहुतांश प्रकल्पग्रस्तांना आपली मिळकत विस्तारीकरणात समाविष्ट होते की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. या जमिनींचा मोबदला राज्य शासन कसा देणार आहे, त्यावरून खातेदारांमध्ये उत्सुकता आहे.