कोल्हापूर : विधानसभा पंचवार्षिक निवडणूक मतमोजणी प्र्रक्रिया किरकोळ वादावादी वगळता शांततेत पार पडली. कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. विजयी उमेदवारांना शहरासह गावोगावी मिरवणुका काढण्यास बंदी घातल्याने किरकोळ वादावादी सोडली तर हाणामारीच्या घटना घडल्या नाहीत. पोलिसांनी सतर्क राहून सुमारे १९ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवले, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुरुवारी दिली.
दहा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी पार पडली. करवीर, कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा व शिवाजी विद्यापीठ राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदाम परिसरात पार पडली. या परिसरासह चौका-चौकांत, उपनगरांत व संवेदनशील गावांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस रस्त्यांवर उभे होते. शहरातील चौका-चौकांत आणि मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या मार्गांवर बॅरिकेट लावून सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
काही वाहनधारक या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस त्यांना रोखत पर्यायी मार्गाने जाण्याचा सल्ला देत होते. पहाटे पाचपासून ते मध्यरात्री १२ पर्यंत पोलीस रस्त्यांवर होते. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाटगे, करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, शाहूवाडीचे अनिल कदम, गडहिंग्लजचे अंगद जाधवर, जयसिंगपूरचे किशोर काळे, इचलकरंजीचे गणेश बिरादार यांच्यासह निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक फौजदार, हवालदार, कॉन्स्टेबल, होमगार्ड सुमारे १९ तास जिल्ह्यातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते.
ताराबाई पार्क, कावळा नाका परिसरात बंदोबस्तभाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या पराभवाच्या दिशेने वाटचालीचे चित्र दिसताच आमदार सतेज पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा आणि कावळा नाका परिसरातील आलिशान हॉटेल परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पराभूत अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके यांच्यासह विजयी उमेदवार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, आदींच्या घरांसमोर बंदोबस्त ठेवला होता. या मार्गावरून दुचाकींवरून जाणाºया कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून होते.
- नाश्त्यावरच बंदोबस्त
बंदोबस्तासाठी पोलीस पहाटे पाचपासून रस्त्यांवर उभे होते. त्यांना फक्त नाश्ता दिला होता. जेवण मिळाले नाही. रस्त्यावर उभे राहून पोलीस बंदोबस्त करीत होते. फूड पॅकेजवर आहे त्या ठिकाणी त्यांना भूक भागवावी लागली.