निपाणी : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर बुधवारी होणाऱ्या मतमोजणीचे सर्वांना वेध लागले आहेत. निपाणी तालुक्यातील २७ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ६३ गावात सध्या आकडेमोड सुरू आहे. बुधवारी होणारी मतमोजणी ही अनेक उमेदवारांचे भवितव्य ठरवणारी असणार आहे.
या मतमोजणीसाठी निपाणी तालुका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. निपाणी येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात मतमोजणी होणार असून १४ खोल्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.
मतमोजणीला २ स्ट्राॅंग रुम व १४ खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. याठिकाणी टेबलवर मतमोजणी होणार आहे. सुमारे १२० कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. यांच्यावर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांचे लक्ष असणार आहे.
मोठा बंदोबस्त
एकाचवेळी ६३ गावांची मतमोजणी होणार असल्याने पोलीस प्रशासनाने जोरदार तयारी केली असून गर्दी टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी भेट देऊन पाहणी करणार आहेत.