कोल्हापूर : सध्या देशाची वाटचाल ही हुकूमशाहीकडे जात असून, ते धोकादायक आहे. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. त्याला सरकारच जबाबदार असून, अशा घटना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ब्लॅक पँथरचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी रविवारी येथे केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात उभारावा, अशी मागणीही त्यांनी केली.शाहू स्मारक भवन येथे ब्लॅक पँथर पक्षातर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा व पक्षप्रवेश, अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘आरपीआय’च्या वंदना कांबळे, संगीता पाटील, प्रवीण आजरेकर यांनी ब्लॅक पँथर पक्षात प्रवेश केला. देसाई म्हणाले, पूर्वीच्या काळात अनेक आव्हाने पेलत सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची कवाडे खुली केली. अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात उभारला पाहिजे.वंदना कांबळे म्हणाल्या, सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणासाठी योगदान दिल्यामुळेच आज महिला अनेक मोठ्या पदांवर काम करीत आहेत. जिल्हा युवक अध्यक्ष दयानंद कांबळे, अश्विनी कांबळे, विजय माने, संगीता पाटील, बाबूराव जैताळकर, मालुबाई कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.महिला अध्यक्ष दीपाली कांबळे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष पुंडलिक नाईक यांनी प्रास्ताविक केले. वसंत लिंगनूरकर यांनी सूत्रसंचालन केले. धोंडिराम कांबळे यांनी आभार मानले.मेळाव्यातील ठराव सावित्रीबाई फुले यांचा पुतळा शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात उभा करण्यात यावा, फायनान्स कंपन्यांकडून अत्यल्प उत्पन्न असलेल्या महिलांनी घेतलेली कर्जे माफ करावी, इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामास लवकर सुरुवात करावी, ब्राह्मण, मराठा, मुस्लिम, इत्यादींसह सर्व जाती धर्मातील फक्त गरिबांना आरक्षण देण्यात यावे, पाच वर्षांपर्यंतची कष्टकरी शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, अशा विविध ठरावांचा यामध्ये समावेश आहे.
देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे
By admin | Published: January 09, 2017 12:49 AM