कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील काेरोची येथील राज माळी यांच्या अभियंता बहिणीचे मंगळवारी गाेव्यातील हार्डवेअर व्यावसायिक शशिकांत गोसावी यांच्याशी धुमधडाक्यात हातकणंगले येथे विवाह पार पडला. लग्नविधी पार पडल्यानंतर या नवविवाहित दांपत्याने लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई आणि जोतिबा मंदिरावर चक्क हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांच्या जयंतीला त्यांच्यावर सामुदायिकपणे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचे अनेक प्रसंग पाहिले असतील परंतु गोव्यातील गोसावी कुटूंबियांनी नवविवाहित दांपत्याकरवी कोल्हापूरच्या अंबाबाई देवीवर आणि जोतिबा मंदिरावर हेलिकॉप्टरमधून हवेतून पुष्पवृष्टी करण्याची हौस पूर्ण केली. हवेतून अर्पण केलेली फुले जोतिबा डोंगरावर तसेच अंबाबाई मंदिर आणि भवानी मंडप परिसरात पसरली होती.गोव्याचे व्यावसायिक श्रीमंत राजाराम गोसावी यांचे सुपुत्र शशिकांत हे हार्डवेअर व्यावसायिक आहेत. त्यांचा विवाह कोरोची येथील स्व. आप्पासाहेब श्यामराव माळी यांची अभियंता असलेली कन्या प्रियंका हिच्याशी मंगळवारी दुपारच्या मुहूर्तावर पार पडला. गोसावी यांच्या घरातील हा शेवटचा विवाह सोहळा असल्याने तो धूमधडाक्यात साजरा करण्याचे त्यांनी ठरविले होते. त्यानुसार कोरोची येथील प्रियंका माळी यांचे बंधू राज यांनी बहिणीच्या विवाह सोहळ्यानंतर अंबाबाई आणि जोतिबावर हवेतून हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यासाठी २३ मे रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे परवानगी मागितली.
करवीरचे प्रांताधिकारी, पन्हाळ्याचे प्रांताधिकारी तसेच करवीर आणि पन्हाळा तहसीलदारांनाही यासंदर्भात कळविले होते. उजळाईवाडी येथील भारतीय विमान प्राधिकरणच्या संचालकांनीही हिरवा कंदिल दाखवल्यानंतर मंगळवारी या नवदांपत्याने विवाहबध्द होताच हेलिकॉप्टरमधून अंबाबाई आणि जोतिबा देवालयावर पुष्पवृष्टी केली.हेलिकॉप्टरचे भाडे तासाला अडीच लाखहौसेला मोल नाही, असे म्हणतात. या नवदांपत्यांच्या हस्ते देवालयांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी खास पुण्याहून हेलिकॉप्टर मागवले होते. पुष्पवृष्टी करण्यासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोलरचीही परवानगी घेतली होती. स्वच्छ हवामानामुळे कोरोची येथे उभारलेल्या हेलिपॅडवरुन दुपारी ३ वाजता नवदापत्यांने हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले आणि अंबाबाई तसेच जोतिबा देवालयावर अवकाशातून पुष्पवृष्टी करुन परत ४ वाजेपर्यंत हातकणंगलेपर्यंत परतीचा प्रवास केला. या हवाई प्रवासासाठी सव्वा लाख रुपये खर्च आल्याचे समजते.