कोल्हापूर : राज्यातील सर्व न्यायालयांचे (पुणे न्यायालयीन जिल्हा वगळून) कामकाज मंगळवार (दि. ०१ डिसेंबर) पासून नियमित सुरू होईल, असे न्यायालयीन प्रशासकीय समितीने बार कौन्सिलला कळविले. न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असणार आहे. या निर्णयाने कामे नियमित होण्यास मदत होईल, असे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रणजित गावडे यांनी सांगितले.कोरोनाकाळात न्यायालयीन कामकाज एका सत्रात सुरू होते. सध्या राज्यातील कोरोना संकटाच्या सद्यःस्थितीचा विचार करून प्रशासकीय समिती आणि महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या सदस्यांत कामकाज पूर्ववत करण्याबाबत विचारविनिमय झाला. त्यानुसार राज्यातील पुणे वगळता न्यायालयाचे कामकाज दोन सत्रांत चालणार आहे.
कर्मचारी, अधिकाऱ्यांची उपस्थिती पूर्ण क्षमतेने राहणार आहे. न्यायालयीन काम संपल्यानंतर पक्षकारांनी, कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आवारात न थांबण्याचीही सूचनाही करण्यात आल्याचे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे यांनी सांगितले.