कोल्हापूर : कसबा सांगाव (ता. कागल) येथे पाहुण्यांचे रक्षाविसर्जन करून परत गावाकडे जाताना पुणे- बेंगळुरू महामार्गावर उजळाईवाडी गावाजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेले सर्जेराव श्रीपती पाटील (वय ६५, रा. भादोले, ता. हातकणंगले) हे जागीच ठार झाले, तर दुचाकी चालवणारा त्यांचा पुतण्या किरण रघुनाथ पाटील (वय ४५, रा. भादोले) गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. ४) दुपारी बाराच्या सुमारास झाला.
सीपीआरच्या अपघात विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, सर्जेराव श्रीपती पाटील हे त्यांचे भाऊ दिनकर, शंकर, शिवाजी आणि पुतण्या किरण यांच्यासह रविवारी सकाळी कसबा सांगाव येथे पाहुण्यांच्या रक्षाविसर्जनासाठी गेले होते. रक्षाविसर्जन आटोपून परत गावाकडे जाताना सर्जेराव पाटील आणि त्यांचा पुतण्या किरण हे एका दुचाकीवर होते. उजळाईवाडी गावाजवळ पाठीमागून आलेल्या कारने किरण यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेले श्रीपती पाटील यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली, तर किरण यांच्या डोक्याला मार लागला. दोन्ही जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, सर्जेराव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. प्रथमोपचारानंतर किरण यांना खासगी रुग्णालयात हलवले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघाताची माहिती मिळताच सर्जेराव पाटील यांचे इतर भाऊ आणि अन्य नातेवाईक सीपीआरमध्ये पोहोचले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सर्जेराव पाटील हे भादोले येथील विकास सेवा सोसायटीचे सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे.