कोल्हापूर : शासनाने आशा कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा कोविड काळातील भत्ता बंद केला आहे. मग आम्हांला कोविडची कामे कशी लावता, अशी विचारणा आशा कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना केली.
हा भत्ता बंद केल्याबद्दल आणि मानधनाच्या विलंबाबत आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर सोमवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. या वेळी सुमन पुजारी म्हणाल्या, भत्ता बंद झाला तरी काही अधिकारी कोविडसंदर्भात कामे सांगत आहेत. यावर
डॉ. साळे म्हणाले, प्रोत्साहन भत्ता पूर्ववत मिळण्यासाठी शासनाकडे मागणी केली आहे. याचा निर्णय होईपर्यंत कोविडची कामे सांगितली जाणार नाहीत. कॉ. शंकर पुजारी म्हणाले, जिल्ह्यामध्ये आरोग्यवर्धिनीचे काम डिसेंबर २०२० करून घेतले जात आहे. परंतु त्याचा काहीही मोबदला अद्याप दिलेला नाही. शिल्लक निधीतून एक महिन्याचे मानधन देण्यात येणार असल्याचे या वेळी साळे यांनी सांगितले. २३ सप्टेंबरपर्यंत आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या वेळी कॉ. विजय बचाटे, कॉ. विशाल बडवे, वनिता खोंगे, लक्ष्मी पाटील, राणी लाड, पूजा लाड, अरुणा कांबळे, संगीता देशमुख, संगीता पाटील, मुक्ता शेटे, राजश्री पाटील, सविता कांबळे, अंजली पडीयार, विजया कांबळे, संगीता पाटील, अनुजा माळी, नीता बेले यांनी नेतृत्व केले.
चौकट
सेवकांच्या पुन्हा नेमणुका करा
याचदरम्यान राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कमी करण्यात आलेल्या सेवकांच्या पुन्हा नेमणुका कराव्यात, अशी मागणी जन आरोग्य अभियानच्या वतीने करण्यात आली. जिल्ह्यातील ३२ कंत्राटी आरोग्यसेवकांना करारानुसार पूर्वसूचना न देता कमी करण्यात आले आहे. कोरोनाकाळात त्यांच्याकडून काम करून घेण्यात आले. ज्या ठिकाणी त्यांना नियुक्ती बदलून देण्यात आली तेथे त्यांनी प्रसूतीबाबतचे केलेले काम विचारात घेतले नाही. हा त्यांच्यावर अन्याय आहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व रवि देसाई, शिवाजी गुरव, काशिनाथ मोरे यांनी केले.
०६०९२०२१ कोल झेडपी ०१
कोल्हापुरात आशा कर्मचाऱ्यांनी कोविड भत्ता बंद केल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले.