कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गुरुवारी एक रुग्ण कोविड १९ पॉझिटिव्ह आला आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाची स्थिती धोकादायक नसली तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून वैयक्तिक काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी केले आहे.नागरिकांना स्वतःला, आणि कुटुंबाला या आजारापासून दूर ठेवायचे असेल तर वैयक्तिक तसेच सामाजिक खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी मास्क वापर करावा, शक्यतो गर्दी करू नये अथवा गर्दीत जाणे टाळावे, सामाजिक अंतर ठेवून अत्यावश्यक खरेदी करावी, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावेत, वय ५० वर्षांवरील, रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, कॅन्सर, क्षयरोग, दमा यासारख्या व्याधीग्रस्तांनी विशेष काळजी घ्यावी, सर्दी, ताप, खोकला अंगावर न काढता वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.सध्या राज्यात कोरोनाचे ४५ रुग्ण आढळून आले असून त्यात कोल्हापूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे. त्याबाबत सावधगिरी बाळगण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनीही ऑनलाइन आढावा बैठक घेतली.
कोल्हापुरात आढळला कोविड पॉझिटिव्ह रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 11:24 AM