पन्हाळा - शहराच्या पुर्वेस पावनगड परीसरात वावरणा-या गव्यांच्या कळपामुळे भिती निर्माण झाली असुन वनविभाग व नगरपरिषद या बाबत कोणतीही पावले उचलत नसलेने तेथील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत व भितीदायक झाले आहे.पावनगड, रेडेघाट, मार्तंड या परीसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या ठिकाणी वन्य प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी यांची संख्याही भरपुर पहावयास मिळते. अधुन-मधुन बिबट्याचे दर्शन पण होते. १८ ते २० गव्यांनी या परीसरात गेले दोन वर्षांपासुन वास्तव्य केले आहे.
यातील दोन माद्यांबरोबर लहान पिल्ले पहावयास मिळु लागली असुन पावनगडावर जाण्या- येण्याच्या रस्त्या जवळील जंगलात हा गव्याचा कळप दिसुन येवु लागल्याने भिती निर्माण झाली आहे. सध्या या गव्याच्या कळपात दोन मोठे गवे आहेत तर बाकीचे लहान मोठे गवे पहायला मिळतात.सकाळी व सायंकाळी या परीसरात फिरावयास जाणाऱ्या स्थानीक लोकांनी फिरणे बंद केले असुन या गव्यांनी आपले राज्यच निर्माण केले आहे. या बाबत वनविभाग गांभिर्याने गव्यांच्या कळपाची दखल घेत नाही. नगरपरिषद हद्दीत पावनगड येतो पण जंगल भागातील हे गवे हुसकावण्याचे आमचे काम नसलेचे मुख्याधिकारीकडुन सांगीतले जाते.
या सर्व शासकिय लालफितीत पावनगड रहीवासी मात्र दहशतीखाली आपले जीवन व्यतीत करत आहेत. सध्या हा गव्यांचा कळप पावनगडावरील पाण्याच्या टाकीपर्यंत येत असलेचे तेथील रहिवासी समीर मुजावर यांनी सांगीतले या पाण्याच्या टाकी पासुन राहण्याचे ठिकाण शंभर फुट आहे. गव्यांच्या वावराने पावनगड वासीयांचे जीवन भितीदायक असल्याचे जाणवत आहे.