राजाराम लोंढे ।कोल्हापूर : कडक उन्हामुळे राज्यातील दूध संकलनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्या तुलनेत कोल्हापुरात पाणी व चाऱ्याची उपलब्धता चांगली असल्याने दूध संकलनावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) दूध संकलन एप्रिल २०१८ च्या तुलनेत प्रतिदिनी १७ हजार लिटरने घट झाली आहे. संकलन घटण्यामागे कडक उन्हाळ्याचे कारण नसून संघाने परजिल्ह्यातील गाईचे दूध घेण्यास बंद केल्याचा परिणाम घटीवर दिसत आहे; त्यामुळेच गाईच्या रोजच्या दुधात तब्बल १.१८ लाखाने घट झाली असली, तरी म्हशीचे दूध मात्र तब्बल एक लाख लिटरने वाढले आहे.
यंदा राज्याच्या तापमानाने सारे उच्चांक मोडले आहेत. विदर्भ, मराठवाड्यात तर सूर्यनारायण कोपल्याने त्याचा थेट परिणाम जनजीवनावर होत आहे. पाणी व चारा टंचाईने पशुधन धोक्यात आले आहे. जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न मराठवाड्यासह सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसमोर आहे; त्यामुळे दूध उत्पादनातही मोठी घट झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे तापमानही गेल्या १0 वर्षांत पहिल्यांदाच ४२ डिग्रीपर्यंत पोहोचल्याने येथेही जनजीवनावर परिणाम झाला; पण येथे पाणी व ओला चारा मुबलक असल्याने दुधात फारशी घट झालेली दिसत नाही.
जिल्ह्याचे रोजचे सरासरी दूध संकलन १६ लाख लिटर आहे, त्यापैकी १२.५० लाख लिटर संकलन ‘गोकुळ’ दूध संघ करतो. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात ‘गोकुळ’ दूध संघाचे सरासरी रोजचे दूध उत्पादन ११ लाख ६३ हजार लिटर होते. तेच या वर्षी ११ लाख ४६ हजार लिटरपर्यंत खाली आले. पाणी व चाºयाची जिल्ह्यात टंचाई नाही, तरीही दूध संकलनात घट दिसते. याला महत्त्वाचे कारण म्हणजे दूध पावडरच्या दरात मोठी घसरण झाल्याने गाईचे दूध अतिरिक्त होत आहे. त्यामुळेच ‘गोकुळ’ने गेल्या वर्षभरापासून परजिल्ह्यातील गाईचे दूध नाकारले आहे. त्याचा परिणाम संघाच्या एकूण संकलनावर दिसत आहे.एप्रिल महिन्यातील रोजचे तुलनात्मक संकलनदूध एप्रिल २०१८ एप्रिल २०१९ घट/वाढम्हैस ५.२५ लाख लिटर ६.२६ लाख लिटर १.०१ लाख लिटर वाढगाय ६.३८ लाख लिटर ५.२० लाख लिटर १.१८ लाख लिटर घट
‘गोकुळ’च्या म्हैस दुधास मोठी मागणी‘गोकुळ’कडे सध्या ५.२० लाख लिटर गाईचे दूध संकलित होते. त्यापैकी ३.५० लाख लिटर दूध लिक्विडमध्ये विक्री होते; पण म्हशीचे सव्वासहा लाख लिटर दूध संकलन होऊनही दूध कमीच पडत आहे. इतकी मागणी मुंबईसह मोठ्या शहरात आहे. राज्यात दुष्काळाचा फटका दूध संकलनाला बसला असला, तरी कोल्हापूर जिल्ह्यात तशी परिस्थिती नाही. ‘गोकुळ’चे म्हशीच्या दूधसंकलनात मोठी वाढ झाली. गाईचे दूध अतिरिक्त झाल्याने परजिल्ह्यातील दूध नाकारल्याने सरासरी संकलन कमी दिसते.- शरद तुरंबेकर (संकलन अधिकारी, गोकुळ)