मलकापूर : मलकापूर शहरालगत असलेल्या कोपार्डे गावच्या शिवारात गव्यांच्या आगमनाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. शिवारात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. नागरिकांनी गवे पाहण्यासाठी गर्दी केली होती.
शहरालगत असलेल्या कोपार्डे गावाच्या शिवारात गव्यांचा कळप मलकापूरमधील शाळी नदीकिनारी असलेल्या शेतात आला. यावेळी नागरिकांसह शेतकरीवर्गात चांगलीच धावपळ उडाली होती. नागरिकांना पाहताच गवे बिथरले व शिवारात सैरावैरा पळू लागले. त्यातील एक गवा पेरीड गावच्या शिवारात जखमी होऊन पडला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गव्याला ट्रॅक्टरमध्ये बांधून जंगलात सोडले. वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे वनपाल संजय कांबळे. वनरक्षक राजाराम राजगिरे, जालिंदर कांबळे, वनसेवक दिनकर पाटील, सर्जेराव पवार आदींसह मलकापूर नगर परिषदेचे अग्निशामक दलाचे कर्मचारी, पेरीड ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गव्यांना हुसकावून लावण्यात वनविभागाला यश आले.