कोल्हापूर : दोन वेळा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही आणि चार दिवसांत पगाराचे आश्वासन मिळाल्यानंतरही सीपीआरच्या ५८ डॉक्टरांचा अजूनही पगार मिळालेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या प्रश्नाची जबाबदारी मी घेत आहे, असे स्पष्ट केले.
सीपीआरच्या कंत्राटी ५८ डॉक्टरांचा चार महिन्यांचा पगार मिळालेला नाही. याआधी एकदा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्यांना पगाराचे आश्वासन देण्यात आले, म्हणून त्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, महिना उलटून गेला तरी पगार न झाल्याने २२ जुलै २०२१ रोजी त्यांनी काम बंद केले. सकाळपासून आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांना बोलावून चर्चा केली. लवकर पगार करण्याचे आश्वासन दिले आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
त्यानुसार आंदोलन मागे घेऊन त्याच दिवशी डॉक्टर्स कामावरही हजर झाले. याला पाच दिवस उलटले तरी अजूनही या सर्वांना पगार मिळालेला नाही. दरम्यान, केवळ ९ लाखांचे अनुदान आल्याने ९ डॉक्टरांचा केवळ एका महिन्याचा पगार देण्यात आला आहे. ही वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. दीड वर्ष कोरोनाकाळात नेटाने काम करणाऱ्या डॉक्टरांचा चार- चार महिने पगार होत नाही, हे योग्य नसल्याचे सांगताच पवार यांनी त्यांच्या स्वीय सहायकांना याबाबत माहिती घेण्यास सांगितले. या प्रश्नाची नोंद घेण्यास सांगितले, तसेच ही जबाबदारी मी घेत असून, लवकरच पगार होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.