कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयात वॉर्डबॉयची नोकरी लावण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या सीपीआर रुग्णालयातील संशयित चालकास २५ हजारांचे टोकन तक्रारदाराकडून स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी सापळा रचून रंगेहात पकडले.
राहुल प्रल्हाद बट्टेवार (वय ३४, रा. पंचरत्न कॉलनी, ठोंबरे मळा, कसबा बावडा) असे संशयित चालकाचे नाव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयात उपचारांसाठी शेकडो रुग्ण येत आहेत. त्यामुळे हे रुग्णालय सर्वांच्या केंद्रस्थानी आहे. ही कारवाई झाल्यानंतर सीपीआर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वॉर्डबॉय ते प्रयोगशाळा परिचर, साहाय्यक अशी विविध पदे भरण्याची जाहिरात काढली होती. त्या अनुषंगाने संशयित बट्टेवार याने तक्रारदार व त्याच्या भावाला सीपीआरमध्ये वॉर्डबॉय म्हणून नोकरीस लावण्याचे आमिष दाखविले.
यासाठी पाच लाख रुपये देण्याचा वायदा ठरला. त्याने तक्रारदार व त्याच्या भावाला एक वर्षे कोरोना विभागात वॉर्डबॉय म्हणून तात्पुरती नोकरी करावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर मुंबई येथे मंत्रालयात जाऊन ही नोकरी मी कायम करून देतो, असे आश्वासन तक्रारदाराला दिले होते. त्यातील पहिले टोकन म्हणून २५ हजार रुपये शुक्रवारी देण्याचा वायदा संशयित बट्टेवार याने ठरवून घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी दुपारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेजस्विनी सांगरूळकर यांच्या कक्षाबाहेर त्याने हे तक्रारदाराकडून पैसे स्वीकारले.
तत्पूर्वी लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कक्षाबाहेर सापळा रचला होता. त्यात हा संशयित पैसे स्वीकारताना अलगदपणे सापडला. या कारवाईमुळे सीपीआर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. ही कारवाई विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, साहाय्यक फौजदार शामसुंदर बुचडे, कर्मचारी संदीप पडवळ, मयूर देसाई, रूपेश माने यांनी केली.