कोल्हापूर : कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये १४ वर्षांखालील मुलामुलींना संसर्ग होऊ शकतो असे गृहीत धरून येथील सीपीआर रुग्णालयामध्ये तयारी सुरू करण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी याबाबत शुक्रवारी एक बैठक घेतली.
दोन दिवसांपूर्वी येथे आलेल्या टास्क फोर्स सदस्यांनी तिसऱ्या लाटेची शक्यता गृ़हीत धरून तयारी करण्याच्या सूचना केल्या होत्या. आतापासूनच याबाबत तयारी केली तर एकदम यंत्रणेवर ताण येणार नाही; म्हणूनच डाॅ. मोरे यांनी ही बैठक घेतली. याला सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
या तिसऱ्या लाटेचा सामना करताना लहान मुलामुलींसाठी ४०० बेडची तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण लोकसंख्येपैकी अशा मुलामुलींची संख्या ३० टक्के गृहीत धरून त्याच्या दहा टक्के बाधित होऊ शकतात असे याबाबत गणित मांडण्यात येते. त्यानुसार ४०० बेडपैकी पहिल्या टप्प्यात सीपीआर इमारतीमध्ये जे ग्रंथालय आहे, या ठिकाणी ८० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. येथील ग्रंथालय शेंडा पार्कमध्ये हलविण्यात येणार आहे.
तसेच २५ अतिदक्षता विभागांतील बेड तयार करण्यात येणार आहेत. ज्या बेंडना व्हेंटिलेटर, सर्व प्रकारची ऑक्सिजन पुरवठा सुविधा, मॉनिटर असेल. जेणेकरून जर प्रकृती गंभीर झालीच तर त्यावर तातडीने उपचार करता येतील, असे ठरविण्यात आले.