कोल्हापूर : जिल्ह्यात संसर्ग वाढल्यामुळे कोरोना रुग्णांवरील उपचाराकरिता राखीव ठेवण्यात आलेल्या येथील सीपीआर रुग्णालयात आता पूर्ववत सर्व रोगांवरील उपचार सुरु करण्यात आले.
सोमवारी रुग्णालयात मात्र नेहमीपेक्षा तुलनेते गर्दी कमी दिसून आले. रुग्णालय सर्वोपचाराकरिता सुरू झाले असले तरी पुढीलकाळात शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्याची मागणी होऊ लागली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरिबांचा दवाखाना म्हणून ओळख असलेले सीपीआर रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर तेथे केवळ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू ठेवण्यात आले. तेथील सर्व विभाग तात्पुुुुुुुुरते कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आले.
या बदलामुळे ऐन कोरोना महामारीत गोरगरीब रुग्णांची मात्र मोठी गैरसोय सुरू झाली. आता जिल्ह्यातील कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात आली असून रोज समोर येणाऱ्या रुग्णांची प्रमाणही प्रचंड कमी झाले आहे.साथ नियंत्रणात असल्यामुळे सीपीआर रुग्णालयात पूर्ववत सर्व रोगांवर उपचार सुरू करावेत, अशी मागणी जोर धरत होती. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी या मागणीचा पाठपुरावा केला.
शनिवारीही त्यांनी एक बैठक घेऊन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांना त्यांनी पूर्ववत रुग्णालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारपासून या रुग्णालयात सर्व रोगांवर उपचार सुरू करण्यात आले.