कोल्हापूर: सीपीआरच्या सर्जिकल साहित्य खरेदीचा ठेका मिळवण्यासाठी मुलुंड येथील कामगार विमा रुग्णालयाचे बोगस दरकरार पत्र तयार करून त्याद्वारे ४ कोटी ८७ लाख रुपयांचा ठेका मिळविल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. चौकशीसाठी पुढच्या आठवड्यात मुंबईहून वरिष्ठ अधिकारी येण्याची शक्यताही असल्याचेही सांगण्यात आले.‘लोकमत’ने हे बोगस दरकरार पत्राचे प्रकरण उघडकीस आणले असून त्या सर्व प्रकरणामध्ये सीपीआरच्या प्रशासनाने बेफिकिरी दाखवत ठेकेदाराला सोयीची भूमिका कशी घेतली हे सोदाहरण स्पष्ट केले आहे. याबाबत मुश्रीफ यांनी बातमी प्रसिद्ध झालेल्या पहिल्याच दिवशी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांना या प्रकरणाची माहिती घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मुश्रीफ हे शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी या प्रकरणाबाबत त्यांच्याशी संपर्क साधला आणि या प्रकरणामध्ये ‘न्यूटन’ प्रमाणेच कारवाई होणार का, अशी विचारणा केली असता ते म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे मी आदेश दिले आहेत. गरज पडली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून ही चौकशी केली जाईल. अधिष्ठाता यांनाही मी माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत.‘न्यूटन’ च्या प्रकरणातही मी अन्न आणि औषध प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देऊन संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. याही प्रकरणात चौकशीनंतर जे काही सत्य समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.
सीपीआर बोगस दरकरारपत्राद्वारे खरेदीच्या चौकशीचे आदेश, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 1:12 PM