गणेश शिंदे
कोल्हापूर ,9 : गृहविभागाने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेमलेल्या सुरक्षारक्षकांनी गेले १५ दिवस काम बंद केल्याने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची (सीपीआर) सुरक्षा राम भरोसे झाली आहे. सीपीआरचे प्रवेशद्वार म्हणजे ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ बनल्याने रुग्णालयाची सुरक्षाच धोक्यात आली आहे.
राज्यात मुंबई, नाशिकसह शासकीय रुग्णालयात निवासी व आंतरवासीयता वैद्यकीय अधिकारी यांच्यावर रुग्णांच्या नातेवाइकांकडून हल्ले झाले, याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांनी महाराष्ट्रातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोलीस महासंचालक कार्यालयाकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या सुमारे दीड हजार सुरक्षारक्षकांची नेमणूक केली.
कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ‘सीपीआर’साठी जादा ५६ सुरक्षारक्षकांची मागणी केली होती. त्यानुसार १ जुलै २०१७ पासून ‘सीपीआर’च्या सेवेत ५१ सुरक्षारक्षक आलेत. या सुरक्षारक्षकांना वॉकीटॉकीसह अन्य सुरक्षेच्या सुविधाही देण्यात आल्या; पण आपणाला कामावर नियमित करावे या मागणीसाठी काम बंद ठेवले आहे.
एकंदरीत, राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतही अशीच परिस्थिती असल्याचे शासकीय वैद्यकीय रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘सीपीआर’मध्ये एकूण २१ विविध विभाग आहेत. त्यांपैकी अपघात विभाग, अतिदक्षता विभाग (आयसीयू), प्रसूती विभाग हे महत्त्वाचे विभाग आहेत. विशेषत: म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराजवळ होणारी गर्दीवर नियंत्रण राहावे याची या सुरक्षारक्षकांवर जबाबदार होती. रोज सकाळी आठ ते दुपारी चार, चार ते रात्री १२ व रात्री १२ ते सकाळी आठ अशा तीन शिफ्टमध्ये हे सुरक्षारक्षक कार्यरत होते.१९ सुरक्षारक्षक कार्यरत...सध्या या सुरक्षारक्षकांनी काम बंद केल्याने एका खासगी कंपनीकडून नेमलेल्या १९ सुरक्षारक्षकांवर जबाबदाºया आहेत. एकंदरीत, सीपीआरमधील नागरिकांचा राबता पाहता, या सुरक्षारक्षकांवर कमालीचा ताण येत आहे.दृष्टिक्षेपात...
- सीपीआरचे विभाग : २१
- अतिमहत्त्वाचे विभाग : अपघात विभाग, अतिदक्षता विभाग.
- राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सुरक्षारक्षकांनी ठेवले काम बंद.
सुरक्षारक्षकांच्या ‘काम बंद’बाबतचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप शासनाकडून सुरक्षारक्षकांच्या पूर्ववत सेवेचा निर्णय झालेला नाही.- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता,राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर. :‘सीपीआर’मधील सुरक्षारक्षकांबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना दोन दिवसांपूर्वी या प्रश्नी निवेदन दिले आहे. सुरक्षारक्षकांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी काम बंद ठेवले, हे समजू शकले नाही.- डॉ. रामप्रसाद राजेभोसले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष,‘महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडेन्सी डॉक्टर ’(मार्ड).