भारत चव्हाणकोल्हापूर : स्वस्त दरात आणि खात्रीशीर उपचार होत असल्याचा रुग्णांच्या मनातील विश्वास आणि कोविडकाळात अतिशय चांगली कामगिरी करुन संपादन केलेली विश्वासार्हता यामुळे येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय (सीपीआर) रुग्णालयातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. २०२१ सालातील सीपीआर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) नोंद झालेल्या ६६ हजार २७९ रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मेडिसीन विभागाचे आहेत. त्याखालोखाल अस्थिरोग, नेत्र तसेच सर्जरी विभागााचे आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे तसेच सर्वोपचार रुग्णालय म्हणून सीपीआरला दर्जा मिळालेला आहे. जिल्हा रुग्णालय म्हणून त्याची शासकीय दप्तरी नोंद आहे. संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. या ठिकाणी किफायतशीर दरात खात्रीशीर उपचार होत असल्याने रुग्णांचा ओढा जास्त आहे. विशेष म्हणजे पूर्वी सीपीआर म्हणजे नागरिक नाकं मुरडायचे. परंतु कोरोनाकाळात या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच नर्सिंग स्टाफने अतिशय चांगले काम केले होते. त्यामुळे रुग्णालयातील मिळणाऱ्या उपचाराबाबत सर्वसामान्य रुग्णांच्या मनात एक विश्वासार्हता निर्माण झाली आहे.
कोविडकाळात सीपीआरमध्ये केवळ कोरोनाबाधित रुग्णांवरच उपचार केले जात होते. एप्रिल २०२१ पासून पुन्हा रुग्ण वाढायला लागले तसे पुढे सर्वसाधारण रुग्णांसाठी ते बंद करण्यात आले. मे, जून , जुलै व ऑगस्ट अशा चार महिन्यांत केवळ कोविड रुग्णांवर उपचार केले गेले. आठ महिन्यांत सीपीआरमध्ये ६६ हजार २७९ रुग्णांची ओपीडीला नोंद झाली.
सीपीआर रुग्णालयावर असलेला रुग्णांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. चांगली रुग्णसेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. कोरोनाच्या काळात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या पण आता कोरोना कमी झाल्यामुळे प्राधान्याने शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत. दिव्यांगबांधवांना प्रमाणपत्रे देण्याचेही काम सुरू ठेवले आहे. - डॉ. गिरीष कांबळे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर रुग्णालय
सर्वाधिक चाललेल्या ओपीडीचा आढावा -
महिना | मेडिसीन | सर्जरी | ऑर्थोपेडिक | ईएनटी | डेन्टिस | आय | पेडियाट्रिक | स्कीन |
जानेवारी | २३४१ | १६२४ | २२५० | १४२४ | १९४ | २०५४ | २८८ | ९३५ |
फेब्रुवारी | २९४० | १६८२ | २३४८ | १५८० | २६१ | २१७९ | ३७२ | ९४३ |
मार्च | २७२३ | १६९२ | २३१० | १४९१ | ३४९ | २११७ | ४४३ | १०१३ |
एप्रिल | ४७८ | ३९२ | ५६० | २५२ | ६५ | ४५६ | १०४ | २१३ |
सप्टेंबर | २३७ | १७० | - | १८१ | २५ | १५३ | ३१ | ६६ |
आक्टोंबर | १७३४ | १४८७ | १०९६ | १२१५ | २९० | ३०० | ३५७ | ७१३ |
नोव्हेंबर | १८२० | १७४८ | १६९५ | ११४१ | २८२ | १८८६ | ४४७ | ७३८ |
डिसेंबर | २२६५ | १७४९ | १८६१ | १२५३ | ३०० | १६५१ | ४१० | ८६५ |
( सीपीआर हॉस्पिटल मे, जून, जुलै, ऑगस्ट या चार महिन्यांसाठी कोविड रुग्णांसाठी आरक्षित होते.)