कोल्हापूर : दीड वर्षापूर्वी रेल्वे उड्डाणपूल येथे झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी दुपारी तारखेसाठी पोलीस व्हॅनमधून आणले होते. यावेळी दोन्ही गटांच्या आरोपींमध्ये पोलीस व्हॅनमध्येच जोरदार हाणामारी झाली. आरोपींच्या दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांनीही त्यांना बाहेरून शिव्यांची लाखोली वाहिली. बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केली. जिल्हा न्यायालयासमोर ही घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली व त्यामुळे गोंधळ उडाला. रेल्वे उड्डाणपुलानजीक झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपी कळंबा मध्यवर्ती कारागृहात आहेत. या गुन्ह्यातील दोन्ही गटांच्या आरोपींना तारखेसाठी टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी दुपारी आणले होते. तारखेला हजर राहून दोन्ही बाजूंच्या आरोपींना पोलीस व्हॅनमध्ये बसविले. यावेळी दोघांचेही नातेवाईक पोलीस व्हॅनभोवती उभे होते. अचानक व्हॅनमध्ये आरोपींमध्ये जोरदार हाणामारी झाली. बाहेर उभ्या असलेल्या नातेवाइकांनी व्हॅनवर चढून खिडक्यांतून आरोपींना शिव्यांची लाखोली वाहिली. दरम्यान, व्हॅनमध्ये बंदोबस्तास असणाऱ्या महिला व पुरुष पोलिसांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केली. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी खाकीचा प्रसाद देत आरोपींना वठणीवर आणले. भररस्त्यावर पोलीस व्हॅनमध्ये हाणामारी आणि बाहेर नातेवाइकांच्या गोंधळामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. दरम्यान, या घटनेची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व्हॅनवर पोलीस मुख्यालयातील कर्मचारी बंदोबस्तास होते. ते तेथून थेट लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आले. या ठिकाणी काही वेळ बाहेर थांबून ते कारागृहाकडे निघून गेले. न्यायालयासमोर हाणामारीची घटना तसेच पोलिसांना धक्काबुक्की होऊनही एकाही पोलिसाला तक्रार द्यावीशी वाटली नाही. लक्ष्मीपुरी पोलिसांनी मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन झालेल्या सर्व प्रकाराची माहिती नियंत्रण कक्षाला कळविली. या हाणामारीची चर्चा शहरात दिवसभर होती. (प्रतिनिधी)
पोलीस व्हॅनमध्ये आरोपींच्या दोन गटांत हाणामारी
By admin | Published: February 03, 2016 12:52 AM