कोल्हापूर : कोणत्या गोष्टीमुळे आपत्ती ओढवू शकते, याचा विचार करून प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व आपत्ती व्यवस्थापन समितीची छत्रपती शिवाजी सभागृहात बैठक गुरुवारी बैठक झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, भविष्यात येणारी आपत्ती रोखण्यासाठी प्रत्येक विभागाची पूर्वतयारी हवी, त्यासाठी योग्य नियोजन हवे. आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन पूर्वतयारी, प्रतिसाद, खर्चाचे अंदाजपत्रक यांचा समावेश यामध्ये असावा.
हा आराखडा सर्वांना बंधनकारक असून लवकरात-लवकर बनवून तो सादर करावा. प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी संगणकीय सादरीकरण करून प्रत्येक विभागाने सुट्टीच्या दिवशी आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्याबाबत सांगितले.