कोल्हापूर : ईडब्ल्यूएस आणि एसईबीसीच्या वादामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांची कोंडी झाली. राज्य सरकारने अधिसंख्य जागा (सुपर न्यूमररी) निर्माण करून ही कोंडी फोडावी. त्याबाबत त्वरित निर्णय व्हावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी रविवारी केली.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाकडे ‘लोकमत’ने ‘एमबीबीएसच्या प्रवेशामध्ये मराठा तरुणांची कोंडी’ या वृत्ताद्वारे शनिवारी लक्ष वेधले. आरक्षणाच्या स्थगितीचा आदेश पारित होण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये सामायिक प्रवेश परीक्षांसाठीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी १२ टक्के जागांची तरतूद करण्यात आली. त्याप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केले; तर दुसऱ्या बाजूला कला, वाणिज्य, शास्त्र, संगणक शास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, आदी अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश स्थगिती आदेशापूर्वी एसईबीसी प्रवर्गातून देण्यात आले होते. फक्त तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, विधि शिक्षण व व्यवस्थापन शिक्षण थोडक्यात व्यावसायिक शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन मध्यावर आली असताना स्थगिती मिळाली.
न्यायालयासमोर त्या स्थगिती आदेशाच्या युक्तिवादादरम्यान या बाबी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या नसल्याने सध्याची तांत्रिक व कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाली आहे. यावर कोणत्याही प्रवर्गाच्या आरक्षणाला अथवा अधिकाराला धक्का न लावता वैद्यकीय शिक्षणासह अन्य अभ्यासक्रमांसाठी अधिसंख्य जागा निर्माण करून त्यावर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना १२ टक्के जागा निर्माण करून त्यावर प्रवेश देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे,अशी माहिती राजेंद्र कोंढरे यांनी दिली.
ईडब्ल्यू एसचा निर्णय लागू करावा: गायकवाडएसईबीसी आरक्षण टिकणारच नसेल, तर ईडब्ल्यू एस आरक्षणापासून मराठा समाजाच्या तरुणांना वंचित का ठेवायचे? मराठा समाजातील सुमारे ३५० मुले प्रवेश आणि ५० टक्के शुल्काच्या सवलतीपासून वंचित राहणार आहेत. ते टाळण्यासाठी राज्य सरकारने वैद्यकीयसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी त्वरित ईडब्ल्यू एसचा निर्णय लागू करावा. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली.