लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील डीकेटीई कॉम्प्युटर विभागातील अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थिनींनी 'फेसमास्क डिटेक्शन सिस्टीम' हा अभिनव प्रकल्प विकसित केला आहे. डीकेटीईमधील विद्यार्थी गेल्या वर्षापासून कोरोनासारख्या विषाणूपासून प्रतिबंधक उपाय शोधण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प हाती घेऊन नवनवीन संशोधन करीत आहेत.
स्नेहल मिरजे, मृदुला खोत, शांभवी पानवेलकर, रविना निंबाळकर व श्वेता कोळी यांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीप लर्निंग' या तंत्रज्ञानाचा वापर करून 'फेसमास्क डिटेक्शन' हा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पामध्ये एखाद्या व्यक्तीने मास्क परिधान केलेला आहे की नाही, हे तपासण्यासाठी मॉड्युल विकसित केले आहे. एखाद्या व्यक्तीने मास्क परिधान केला नसेल, त्यावेळी विशिष्ट अशी आवाज करणारी प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचा वापर मोठ्या कंपन्या, बसस्थानक, रेल्वे स्टेशन व सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या चेहऱ्यावरील मास्क स्वयंचलितपणे शोधण्यासाठी होऊ शकतो. विद्यार्थिनींना प्रा. एस. एस. दरबस्तवार, प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डॉ. डी. व्ही. कोदवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी
२००५२०२१-आयसीएच-०१ डीकेटीईच्या विद्यार्थिनींनी फेसमास्क डिटेक्शन सिस्टीम हा प्रकल्प विकसित केला आहे.