दत्ता पाटील।म्हाकवे : कागल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील सुमारे ९ हजार लाभार्थ्यांची दोन महिन्यांची पेन्शनआयसीआयसीआय बँकेत येऊन जमा आहे. मात्र, ती लाभार्थ्यांपर्र्यंत पोहोचविण्याचे माध्यम कोणते असावे, या राजकीय श्रेयवादात लाभार्थी वेठीस धरले जात आहेत. त्यामुळे शासनाकडून वेळेत पेन्शनची रक्कम उपलब्ध होऊनही प्रतीक्षाच करावी लागत असल्याने लाभार्थ्यांची अवस्था म्हणजे लक्ष्मी आली द्यायला अन् पदर नाही घ्यायला, अशीच बनली आहे.
निराधार लाभार्थ्यांना पेन्शन वाटप करायची कशी यावरून गेल्या वर्षभरापासून राजकीय मतभेद सुरू आहेत. ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी ही पेन्शन राष्ट्रीयीकृत बँकेकडून वाटप व्हावी, असा आग्रह सामाजिक न्यायमंत्री बडोले यांच्याकडे धरला होता. मात्र, आमदार हसन मुश्रीफ यांनी तालुक्यातील प्रत्येक गावांत शाखा नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेतूनही ही पेन्शन वाटप करण्याला परवानगी मिळविली. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरची पेन्शन ही बँकेमार्फत देण्यात आली. तर, माजी आमदार संजय घाटगे गटाचे सरसेनापती व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनराज घाटगे यांनीही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय (३२) सचिवांची भेट घेऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांच्या विनंतीवरून ही पेन्शन वाटप पूर्ववतपणे आयसीआयसीआय बँकेमार्फत गावागावांत जाऊन कर्मचाºयांकडून वाटप व्हावी, अशी लेखी मागणी केली.
त्यामुळे प्रशासनाने जानेवारी-फेब्रुवारीमधील रक्कम आयसीआयसीआय बँकेकडे वर्ग केली आहे. यापैकी सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांची पेन्शन बँक खात्यात जमा झाली आहे. मात्र, उर्वरित नऊ हजार लाभार्थ्यांना अद्याप पेन्शन मिळालेली नाही.तालुक्यात या निराधार योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १३ हजारांवर आहे. त्यामुळे त्यांच्यावर आपल्याच गटाचा प्रभाव राहावा यासाठी सर्वांचा खटाटोप सुरू असतो, परंतु राजकीय श्रेयवादात या लाभार्थ्यांना वेळेत पेन्शन मिळणे दुरापास्त होत आहे. याबाबत लाभार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
सध्या पेन्शन वाटप करणारे कर्मचारी सुशिक्षित बेरोजगारच आहेत. ते अतिशय जबाबदारी आणि शिस्तबद्धपणे प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही पेन्शन पोहोचवितात. त्यामुळे त्या सर्वांनाच कमी करणे अशक्य आहे. यातून योग्य तो मार्ग काढून पेन्शन वाटपासाठी प्रयत्न करू.- धनराज घाटगे, अध्यक्ष, कागल संजय गांधी निराधार योजना